कोरोनाकाळाने विट भट्टी कामगारांना कर्जाच्या खाईत लोटले …

रोजगाराच्या अभावी स्थलांतराचे चटके सहन करत वर्षानुवर्षे धुमसत असलेला मराठवाड्यातील परभणी-हिंगोली जिल्ह्यांचा हा भाग.

1
360

ओळीने अस्थायी तयार केलेली कामगारांसाठीची घरे,त्यावर चौदा एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बांबूंच्या सहाय्याने लावलेली झेंडे.खळी पाटीच्या पुढं गंगाखेड रोड वर तिथून तितक्यात सात आठ घरे.घरांच्या पुढे चार-पाच मुलं खेळत होती,वीट भट्ट्यांवर नजीकच्या गावातून स्थलांतर करून आलेले कुटुंब.एक तरुण तिथे भेटला,अतुल पवळे पुण्यात असतो,ड्रायव्हरचे काम करतो,तो म्हणाला गावात माझा भावाच्या मुलांचे पोषण आहार आधी देत नव्हते,मग मी गावात आल्यावर अंगणवाडी मध्ये जाऊन जाब विचारला पुन्हा तेंव्हा पासून खाऊ देत आहेत.बोलल्या शिवाय काही होत नाही,अस त्याच म्हणणं आलं !

   त्याचा भाऊ तिथे पलीकडे विटा बनवायचे काम करत होता, मातीचा गरा फावड्याने छाटत असतांना त्याची बायको आवश्यकतेनुसार पाणी टाकत होती, त्यांना लॉकडाऊन काळात कुठे होतात विचारल्यावर,इथे वीट भट्यांवरच हंगाम चालू होता तो पर्यंत कामाला असल्याचे त्याने सांगितले,नागेश पवळे त्याचे नाव,आंबेटाकळी या गावातून स्थलांतर करून आलेले तीन जोडपे. मुलांचा पोषण आहार नाही भेटला,पण गावात आई रेशन घ्यायची,पुन्हा आम्ही जाऊन आणायचो.दोन तीन वर्षांपासून इथेच हंगाम असे पर्यंत कामाला असतो,लॉकडाऊनच्या काळात भरपूर कामं नव्हते तर कर्ज होऊन बसले आहे,किती कर्ज झाले आहे ? असे मी विचारल्यावर म्हणाला पंचवीस-तीस हजार आहे.
   रोजगाराच्या शोधात अमरावती जिल्ह्यातून धारणी या गावातून इथे खळी पाटी पाशी असलेल्या वीट भट्ट्यांवर कामाला असलेले एक जोडपे तिथे होते,गावात काम नाहीये म्हणून इथे यावं लागलं, काम लागेनात मग आलोत इथे,आधी गावात जंगलात रोपण लागवडीचे कामे होती,आता ती पण बंद झाली म्हणून मग यावं लागलं,राम भोसले सांगत होता. मी त्यांना म्हणलं ज्यांना रोजगारासाठी स्थलांतर करावं लागतं,त्यांच्या बाबत आम्ही व्हिडीओ बनवतो आपण इथे कॅमेऱ्या समोर आपला अनुभव बोलावा तर त्याने बोलायला नकार दिला.त्याला मी विनंती केली पण तो एकला नाही.
दोन अल्पवयीन मुली आणि आई-बाबा असा परिवार तिथे बाजूला एकाच ठिकाणी काम करत होता, काम करता करता तिथेच जेवायला बसलेला.वरून उन्हाचा पारा अंगावर चिखलाचे रडबडलेले शर्ट आणि बाबाच्या डोक्यावर टावेल पांघरून जेवता जेवता,साठी कडे झुकलेले बाबा बाजूला त्यांची बायको हातात भाकर त्यावर भाजी घेऊन घास घेत सांगू लागली,घरात आठ माणसं हाइत, दोन पोरींचे लग्न झालेले दोन इथं सोबत हाइत”मी त्यांना विचारले मुलींचे शिक्षण ? एक सातवीला हाय, एक दहावीला” आता सुट्या असल्याने वीट भट्ट्यांवर कामाला आल्या आहेत.दोन्ही मुली कामाच्या व्यापात अवेळी वयस्कर दिसायला लागल्यात.एकीच्या नाकावर वांग दिसू लागली होती.
   दोन महिने काम नव्हत,बायको नवऱ्याला मध्येच थांबून म्हणाली,मग इथं थांबून काय करावं म्हणून गावाकडे गेलो.पुन्हा आपसात विचार विमश करून बाबा म्हणले “इथं काय काहीच नव्हतं धने नाही फुल नाही,” मग गावाकडे जाऊन काय केलं,मी विचारलं ? ते म्हणाले मग असच उसने-पासने करून,याला माग त्याला माग” काम नाही धंदा नाही,दोन महिने काय खावं ? त्यांनी पुन्हा मलाच प्रतिप्रश्न केला.मी म्हणलं रेशन भेटते का,माणसं आठ आणि रेशन भेटते पंचवीस किलो,कधी दहा किलो तांदूळ पंधरा किलो गहू तर कधी गहू जास्त कमी असे करतो.एक मुलगा आहे त्याचे लग्न झाले आहे.त्याचा सौंसार आणि त्याचे मुलं बाळ.एकूण कोरोना काळातील जीवनानुभव त्यांनी एक दमात सांगून मोकळं केलं.लॉक डाऊन काळात दवाखाण्याचा काही परसंग आला नाही”पण असे दिवस गेले म्हणून,ते पुन्हा जेवायला लागले.
शाश्वत रोजगाराच्या वनव्यात वर्षानुवर्षे धुमसत असलेला मराठवाड्यातील परभणी-हिंगोली जिल्ह्यांचा हा भाग,सिंचनाच्या असमान पाणी वाटपाच्या राजकीय डावपेचाने ही बारमाही हाताला कामे नसल्याने, किमान वेतनाचे प्रश्न गाव खेड्यातील स्थलांतराला सोबत घेऊन कामगारांच्या आरोग्य,पोषण सुरक्षेच्या भयावह अश्या स्थितीला कारणीभूत ठरत अली आहेत.दिवाळी नंतर गाव की गाव ओसाड पडतात एवढे कामाचे दुर्भिक्ष.रोजगार,आरोग्य,पोषण सुरक्षेच्या अनेक कथा इथे शोधाची भूमी निर्माण झालेली.मानव विकास निर्देशांक,दरडोई उत्पन्न निर्देशांक,शैक्षणिक निर्देशांकवर सहज नजर फिरवली तरी येथील परिस्थितीचा अंदाज यावा
वीट भट्टीवरील मजुरांना परतीचे वेध लागले आहेत.कामाच्या ठिकाणी राख,मातीचा मलमा तयार झालाय, वाऱ्याच्या झुळूकी सह तो उडत जातो आहे.सहा सात महिन्या पासून सुरू असलेल्या हंगामाच्या खाणा-खुणा काय त्या शिल्लक राहिल्या आहेत.कुठे काही भट्ट्या लावण्याचे लाकूड-फाटा,कुठे दूरवर भग्न पार्टिशनचे वाकलेली घरे नजरेला पडतायेत.दोन्ही बाजूला विटांच्या आतून काही कच्चा काही पक्क्या,एक पाऊल वाट तयार झालेली आहे.एखाद दुसरी भट्टी पेटलेली आहे,वाट काढत उन्हाने लाही लाही होत असतांना धुरांच्या वरून पलीकडे सर्व रानातील झाड-झुडपं नाचतानाचा भास होऊ लागला आहे.काही मजूर आपला सौंसार-चंबू गबाळ घेऊन परतले असल्यानं उगाच सून सून वाटायला लागलंय !
शासनाच्या कामगारांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेतील चपाती
“राजू है क्या ? गफ्फार भाईने तिथे पार्टिशनच्या दारा शेजारी उभ्या असलेल्या बाईला उद्देशून विचारले,हे गफ्फार भाई परभणी शहरातील बाबर कॉलोनी मध्ये राहतात.कॉलोनी म्हणजे पिंगलगड नाल्या शेजारी असलेल्या शेतांना,गुंठेवारी प्लॉटिंग करून रोज मजुरी करणाऱ्या घटकांना विकत असतांना असच कॉलोनी नाव पडलेले. बाकी माणसं आजही रानात राहिल्या सारखीच राहतात,कोणी वीस वर्षे झाली कोणी त्याही आधी पासून.मजुरांची वस्ती.
तिथं मूळचा राहणारा आणि आता वीट भट्टीवर कामाला असलेला मजूर माणूस.त्यांना सोबत घेऊन मी इथं कौडगावच्या पुलाच्या पुढं असलेल्या वीट भट्टीवर राजू धलाजी होळकर या मजुराला,त्याच्या पत्नीला बोलायला पुन्हा आलो आहे.
  “हाइत,तुम्हाला बाहीर कोण माणस बोलवायलीत” त्याच्या बायकीने,मध्ये घरात आवरा आवरी करणाऱ्या नवऱ्याला आवाज दिला तसा तो आलो आलो,म्हणून घराच्या बाहेर बाडीच्या झाडाखाली येऊन आमच्या पुढ्यात उभा राहिला.आम्ही जिथं बसलो आहोत तिथं बाजूच्या नाल्याला गेल्या वर्षी पूर आलेला,झाड-झुडपं किर्रर्रर्र करणारी किडे आता दिवसा देखील रात्रीच्या किट अंधारात किर किर करतात तशी करत आहेत.
  मूळचा दगडवाडीचा राहणारा राजू होळकर या कडे परभणीचे आधार कार्ड आहे.मतदान कार्ड कुठलेच नाहीये.त्याची बायको चंद्रकला हे जोडपे आता तिशीत असेल.त्यांना चार मुली.
तिथं कपड्या-लत्यांचे गाठूडे बांधून दारात ठेवले आहे.बाकी चार दोन भांडेकुंडे आणि या पोरी घेऊन तो उद्या पेडगावला जाणार आहे.मी त्याला विचारले “तुम्ही कुठे राहता एरवी,तो म्हणाला आम्ही बाबर कॉलनी मध्ये राहतो,पण आता पेडगावला बहिणीने प्लॉट घेतलाय तर,तिथे जातो आहोत. वीट भट्टीवरचे कामं बंद झालेत.त्याच्या तिन्ही मुली आमच्या पुढं येऊन बसल्यात,मोठी सात वर्षांची सर्वात लहानी आठ महिन्याची वर्षे दीड वर्षाच्या अंतराने या मुली झाल्या आहेत.मी विचारलं “या मोठ्या मुलीच्या वेळेला डिलिव्हरी कुठे झाली तर,हे तिन्ही लेकरं घरीच झालीत,बाबर कॉलोनीत”राजू म्हणाला.
मुलींच्या वेळी गरोदर असतांना नऊ महिने कुठे उपचार घेतला होता का ? तर म्हणाला बाबर कॉलोनीत अंगणवाडीच नाही,तिन्ही लेकरांच्या वेळी काहीच झालं नाही,ताप नाही,खोकला नाही काही नाही.आमच्या आईने डिलिव्हरी केली”जसं शेतात सालानं राहतात,तस दोन दोन वर्षे वीट भट्ट्यांवर कामाला असतोत. भट्टीचे काम बंद व्हायच्या टाइमाला पोरी झाल्या.काही झालं नाही,आम्ही काही उपचार ही केले नाही,काही नाही.
त्याच्या तिन्ही मुलींचा जन्म घरीच त्याच्या आईच्या देखरेखीखाली झाला.इथं परभणीच्या शासकीय रुग्णालया पासून एक-दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरातील बाबर कॉलोनी मध्ये राहणाऱ्या या गर्भवती महिलेची शासन दरबारी नोंद नसावी, तीही तीन वेळा.
  चौथी मुलगी झाली त्यावेळी पेडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलेले,तिथून परभणीच्या शासकीय स्त्री रुग्णालयात रेफर केलं,”शरीक करायला चिट्टी काढुस्तर पोरगी झाली”नॉर्मल डिलिव्हरी झाली,उद्या सकाळी सुट्टी करून घेऊन जा”डॉक्टरांनी सांगितलेले त्याच्या लक्षात होते.
आता इथं कौडगाव रोड वर विटभट्टीवर तुम्ही कामाला असतांना या मुलींचे कुठे अंगणवाडी मध्ये नोंद केलेली आहे का ? मी राजुला विचारले तर तो म्हणाला,इथं जाम गावातून लोक येतात दवाखान्याचे टीका करायला, मागच्या महिण्याखाली आले होते” तुम्ही कौडगावला जावं पोषण आहार घ्यायला,प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेले.
या विटभट्टीवरील अधिकांश मजूर हे परभणी शहरातील बाबर कॉलोनी या भागातील रहिवाशी,त्यांना तिथे असतांना ही अंगणवाडी नसल्याने मुलांची नोंद करून पोषण आहार मिळत नाही,आणि इथे कामावर असतानाही.
मुलींचा घरी जन्म झाल्याने,मोठी मुलगी आता सात वर्षांची झाली असतांना शाळेत प्रवेशित नाहीये,मुलींचा जन्म दाखला काढला का ? असे विचारल्यावर राजू म्हणाला “बामनाचा काढलाय” ! जन्म दाखलाच नाही तर आधार कसे काढणार आणि आधार नसेल तर इतर अनेक ठिकाणी शासकीय सुविधा कश्या भेटणार,प्रामुख्याने शाळेत नाव कसे टाकणार” अंदाजे तारिक पकडो, त्याच्या सोबत काम करणारा एक सहकारी मला म्हणाला” राजू होळकरला शिक्षण नाहीये,त्याने सांगितले काही दुखलं-सुखल तर सोनीच्या दवाखान्यात जातो,नाहीतर जवळ असणाऱ्या कोणत्याही खाजगी क्लिनिक मध्ये उपचार घेतला जातो.
 परभणी मध्ये राहत असतांना, राहत्या भागात पावसाळ्यात पुराचं पाणी वस्तीत,घरात शिरते.गेल्या वर्षी २०२१ मध्ये असेच पाणी शिरले,रात्री बेरात्री तात्पुरती प्रशाकीय यंत्रणांनी स्थलांतराची सोय करून तिथून थोडं जवळ असलेल्या शाळेत,शादी खाण्यात आसरा दिला.स्थलांतराचा आतल्या आत मोठ्या फेऱ्यातून एक लहान होत जाणारा फेरा पूर्ण झाला.
त्याला सात वर्षे झाली हंगाम वजा जाता परभणी शहरात वास्तव्याला,वीट भट्ट्यांचे कामे सुरू झाल्यावर पुन्हा कामाच्या ठिकाणी.त्यात आठवडा भर कामाच्या व्यपातून वेळ भेटत नाही,रविवारी काम बंद असते तर त्या दिवशी सरकारी कार्यालय बंद राहतात,”वरचे वर हाल हाइत,पण आता पोरीला शाळेत टाकणार आहे,राजू म्हणाला.त्याची बायको मघा पासून लहाण्या मुलीला कडेवर घेऊन आमचं बोलणं ऐकत होती, पण एकदाही काही बोलली नाही,म्हणून मीच विचारले “मुलींचे नावे काय ठेवली आहेत ? मोठीच अंजली,सीता-गीता, गीता-सिता, राधा असं दोनदा तीनदा करून अनुक्रमे पक्के केले.मुलीचे नावे सांगायला बाई तीनदा चाचपडली,शिवाय व्यवस्था ही त्यांच्या पर्यंत पोहचायला तयार नव्हती,प्रश्नांचा भला मोठा गुंता घेऊनच मी तिथून उठलो …
श्रमिक विश्व रिपोर्ट 
सचिन देशपांडे,
साथी हेल्थ कम्युनिकेटर,
परभणी-हिंगोली जिल्हा,
मो.७०३८५६६७३८

1 COMMENT

Leave a Reply to Ganpat Bhise Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here