एस.टी कामगार आंदोलनाला जनतेचा व्यापक पाठींबा मिळवण्यासाठी ‘भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष’ मैदानात!

कामगारांच्या संपाला साथ देण्याचे आव्हान करण्याचा निर्धार केला गेला आहे.

0
546
श्रमिक विश्व फोटो

दि.14 रोजी ‘भारताच्या क्रांतिकारी कामगार पक्षाच्या’ वतीने कुर्ला (पूर्व) रेल्वे स्थानक या ठिकाणी निर्दर्शने करण्यात आली व संपाला सामान्य जनतेचा व्यापक स्तरावर पाठींबा मिळावा यासाठी विलीनीकरणाचे महत्व, त्याचे फायदे सांगणारे पत्रकं हजारोंच्या संख्येमध्ये वाटप करत पाठिंब्याचे आव्हान करण्यात आले.

एसटी कामगारांचा संप गेल्या दीड महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रभर सुरु आहे. असे असतांना शासन दरबारी विलीनीकरणाच्या मागणी प्रती प्रचंड उदासिनता दिसून येत आहे. विलीनीकरणाच्या मागणीला मान्य करण्याऐवजी सरकार संपाला फोडण्याचे सुरुवातीपासूनच एक ना अनेक प्रयत्न करतांना दिसत आहे. कामगारांमध्ये फुट पाडण्यासाठी सरकारने कामगारांचे निलंबन करणे, बडतर्फी करणे, सेवा समाप्ती करणे, बदल्या करणे असे अनेक कुटील डाव रचले आहेत. या सर्व कुटील डावांना कामगारांनी वेळोवेळी हाणून पाडत ‘विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहोत’ हे दाखवून दिले आहे. अशात सरकारने ‘मेस्मा’ कायदा लावून संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. कामगारांनी त्याला सुद्धा कैरीची टोपली दाखवत ‘विलीनीकरणासाठी मेस्माला घाबरत नाही!’ अशी भूमिका घेतली आहे असे सांगत, या सर्व घडामोडींच्या दरम्यान सरकारची तळी उचलून धरणाऱ्या भांडवली प्रसार माध्यमांचा वापर करत कामगारांना जनतेसमोर शत्रू सारखे उभे करायला सुरुवात केली आहे. “कामगार संप ताणून धरत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत.” असा खोटा प्रचार करायला सुरुवात केली आहे. या सर्व खोट्या प्रचाराला फाट्यावर मारत “कामगार संप ताणून धरत नसून सरकारच्या अआडमुठेपणाच्या धोरणामुळे कामगार आणि प्रवाशी जनतेचे हाल होत आहेत! व त्याचे खापर सरकार आमच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न्न करत आहे.” अशी भूमिका सरळ जनतेच्या दरबारी कामगारांनी मांडायला सुरुवात केली आहे असे आवाहन करण्यात आले.

श्रमिक विश्व फोटो

भारताच्या क्रांतिकारी कामगार पक्षाने कुर्ला या ठिकाणी आयोजित केलेल्या निर्दशनाच्या माध्यमातून व्यापक जनतेला संबोधित करत विलीनीकरणाचे फायदे आणि खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचे तोटे काय आहेत हे जनतेला सांगायला सुरुवात केली आहे.

निरदर्शना दरम्यान पक्षाच्या वतीने बोलतांना कॉम्रेड बबन ठोके यांनी आपले मत मांडत सांगितले की, कामगारांची विलिनीकरणाची मागणी ही न्याय्य मागणी आहे. असे असताना सरकार मागणीला मानायला तयार नसून उलट कामगारांवर कारवाई ची भाषा करत आहे. कारण सरकारचा यामागील हेतू स्पष्ट आहे की, येणाऱ्या काळात खाजगी कंत्राटदारांच्या तुंबड्या भरत एसटी मध्ये कंत्राटदारीला चालना देत खाजगीकरणाचा मार्ग मोकळा करायचा आणि एसटीचे खाजगीकरण करायचे आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यामध्ये प्रचंड वाढ होईल तर दुसरीकडे एसटी कामगार हा देशोधडीला लागेल. या सरकारी षडयंत्राला वेळीच ओळखून आता एसटी कामगाराला जनतेची साथ व पाठिंबा मिळण्याची गरज आहे.

पुढे कॉम्रेड अविनाश यांनी आपले मत मांडत सांगितले की, विलीनीकरणाची मागणी ही खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात जाते. त्यामुळे सरकार या मागणीला मान्य करायला तयार नाही. अशात केंद्र आणि राज्य खाजगीकरणाच्या धोरणाला झपाट्याने राबवत आहे. यातून स्पष्ट आहे की, सार्वजनिक व्यवसाय, की उद्योग व संपत्तीचे खाजगीकरण करायचे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करून खाजगी उद्योजकांना प्रचंड नफा कमावण्यासाठी कुरणं मोकळी करायचे आहेत. तर महामंडळातील भ्रष्टाचाराने ठेकेदारांना गब्बरगंड करायचे हा या मागील हेतू आहे.

श्रमिक विश्व फोटो

यानंतर कॉम्रेड पूजा यांनी आपले मत मांडताना सांगितले की, एसटी टिकली तर प्रवाशांना फायदा होईल व कामगारांना खात्रीशीर रोजगाराची हमी मिळेल. आज एसटी मुळे राज्यभर महिला सुरक्षित प्रवास करत आहेत. कारण एसटीतील कामगार हा महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत नेहमीच दक्ष असल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे विलीनिकरणाच्या मागणीला समर्थन करणे म्हणजे महिलांची सुरक्षा व प्रवाशांना अल्पदरात प्रवास करायला मिळेल.

आंदोलन प्रसंगी आमित आणि किरण या एसटी कामगारांनी आपली मते मांडत एसटी कामगारांच्या अतिशय भयानक अशा परिस्थितीचे वास्तव जनतेसमोर मांडत एसटीला वाचवण्यासाठी विलीनीकरणाच्या ‘मागणीला साथ द्या’ अशी हाक देत उपस्थित जनतेला कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

एकूणच उपस्थित जनतेचा कामगारांच्या या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. यातून येणाऱ्या काळात सुद्धा अनेक ठिकाणी व्यापक जनतेला कामगारांच्या संपाला साथ देण्याचे आव्हान करण्याचा निर्धार केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here