कसे जगतात पालावरचे भटके-विमुक्त….?

भटक्यांच्या पालांना भेटी देऊन दिसलेले वास्तव : हेरंबकुलकर्णी

 

आज ३१ऑगस्ट.भटके विमुक्तांचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.या दिवशी भटक्यांना कुंपणातून मुक्त करण्यात आले.
नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. पण भटक्यापर्यन्त स्वातंत्र्याचे लाभ अजून पोहोचले नाहीत..

 

दारिद्र्याच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी मी महाराष्ट्रातील २५ जिल्हे फिरलो. त्याचा ‘ दारिद्र्याची शोधयात्रा’ (समकालीन प्रकाशन )
हा अहवाल प्रसिद्ध केला.
तेव्हा लातूर,उस्मानाबाद,बीड,सोलापूर, नागपूर,भंडारा,गोंदिया या भटक्यांच्या सर्वात जास्त वस्ती असलेल्या जिल्ह्यातील अनेक पालांना भेटी दिल्या. तेव्हा महाराष्ट्रातील सर्वात गरीब आणि उपेक्षित समूह हाच असल्याची खात्री पटली आणि प्रश्नाची उत्तरे सोडाच पण अजून त्यांचे प्रश्नच पुढे आले नाहीत असे लक्षात आले..
भेट देताना लक्षात आलं की जाती बदलल्या,गाव बदलली पण वस्त्यांचे प्रश्न एकच आहेत. राहायला स्वत:ची जागा नाही..पक्की घरे नाहीत. रहिवासी दाखला,आधार कार्ड, मतदार यादीत नाव, रेशनकार्ड नाही. मुले शिकत नाहीत,जवळपास भिक्षा मागतात पुरुष महिला पूर्णवेळ जमेल ते काम करताहेत..हे बघितलेल्या सर्व वस्त्यांचे सरासरी वर्णन ठरावे…

पूर्वी भटके गावगाडयाचे भाग वाटायचे. लोकांच्या धार्मिक श्रद्धेचे ते वाहक वाटायचे पण आता समाजाला या वर्गाबद्दल फार प्रेम राहिले नाही .सर्व फिरत्या भटक्यांची ही तक्रार जाणवते.. शिक्षित वर्गाचे प्रमाण वाढल्यापासून मरिआईचा देव्हारा, भविष्य पाहणे, आयुर्वेदिक जडीबुटी यावर भरवसा फारसा राहिला नाही. टीव्हीवर ऑलिंपिक व जिमन्यास्टिक बघत असलेल्या वर्गाला डोंबार्‍याच्या खेळात विशेष काही वाटत नाही. रामायण महाभारत मालिका बघितल्यावर सोंग घेवून येणारे भटके आकर्षित करीत नाहीत आणि बहुरूप्याच्या गमतीला फसवून घेण्यातील आनंद घेण्याइतके भाबडे मन समाजाचे राहिले नाही..त्यामुळे भटकंती करून ही अपेक्षित पैसा मिळत नाही वर पुन्हा ‘हात पाय धड असताना हे खेळ करून कशाला भीक मागता ?”हे ऐकावे लागते “त्यातून महाराष्ट्राच्या बाहेरही काहीजण जातात. भंडारा येथील भटके तर पश्चिम बंगाल, बिहारात जाऊन आलेले होते.
एक खूप वेगळे निरीक्षण हे आहे की भटके विमुक्तात आता खूप थोडे लोक आपला पारंपारिक व्यवसाय करतात.मी गोंधळी,नाथजोगी,मांग गारुडी ,गोपाळ,बहुरूपी यासारख्या जमाती बघितल्या. तेव्हा अनेकजण जातीचे व्यवसाय करीत नव्हते.याउलट कान साफ करणे ,म्हशी भादरणे,म्हशी सांभाळणे ,भंगार गोळा करणे, केस गोळा करणे असे व्यवसाय करतात. यातून त्यांचे प्रश्न बदलले आहेत.. अकोला जिल्ह्यातील बल्लाळी येथे नाथजोगी म्हैस आणतात. ती ८ महीने सांभाळतात. १००० रुपये महिना मिळतो. याच वस्तीतील काहीजण वाजंत्री वाजवायला जातात. .गोसावी वस्तीत आता नव्या पिढीची मुले स्टोव्ह,कुकर आणि मिक्सर दुरुस्ती करतात.. भंगार गोळा करण्यात सर्वात जास्त भटके आहेत. रोज १५० रुपये मिळतात.. भंडारा,उस्मानाबाद मध्ये भांडी देवून केस गोळा करण्याचा व्यवसाय करतात. एक किलो केस जमायला ५०० रुपयाची भांडी द्यावी लागतात. हे एक किलो केस जमायला आठ दिवस लागतात. ..बार्शीचे डवरी गोसावी तरुण मुले टिकल्या,बक्कल,चाप,पिना,बांगडी,पिन,साडी प अशा वस्तु विकायला रोज किमान २० किलोमीटर फिरतात….काही महिला बेन्टेक्सचे दागिने विकतात. अन्सारवाडा येथील गोपाळांनी बॅंडपार्टी काढली आहे. त्यातून मोठ्या लग्नाची सुपारी घेतात..

पारंपारिक व्यवसाय करणारे जे थोडे लोक आहेत त्यांना कमाई विचारली दिवाळी,रंगपंचमी आणि पाडवा अशावेळी लोक जास्त पैसे देतात.पण डोक्यावर मरीआईचा ५ किलो वजनाचा देव्हारा मिरवावा लागतो.पारंपारिक घिसाडी कुटुंबातील ४ लोक रोज एका गावाला जातात. विळा,खुरपे,कुऱ्हाड,कडबा कात्री,कत्ती,फास या वस्तू लोक बनवून घेतात.दिवसभरच्या कामात ४०० रुपये मिळवतात आणि त्यासाठी ४ लोक काम करतात. प्लास्टिक व फायबर मुळे मागणी खूपच कमी झाली आहे. मांग गारुडी वस्तीतील अनेक तरुणलोखंडीकात्री,विळा, सुरी या वस्तुंना धार लावतात… अन्सारवाडा येथील कैकाडी कुटुंब बांबू पासून टोपल्या विणण्याचे काम करतात.

भटक्यांची सुरक्षितता हा प्रश्न जटिल झालाय …फिरताना होणारे हल्ले ही एक बाजू झाली पण ज्या गावात ते राहतात तिथेही काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ले होताहेत.. तीन गावात भटक्या विमुक्तांवर हल्ले झाल्याचे आढळले. भंडारा जिल्ह्यात चोरखमारी येथे गोपाळ वस्तीतील एका मुलीने शेतातून वांगे तोडले म्हणून गावातील ५० पेक्षा जास्त लोकांनी वस्तीवर हल्ला केला.बेदम मारहाण केली. झोपड्या तोडल्या. .पोलिसात गेलात तर खुनाची धमकी दिली. भंडारी जिल्ह्यात साकोली तालुक्यातील पिंपळगाव येथे बहुरूपी वस्तीला गावात घरे मिळणार होती .तेव्हा हे कायमचे गावात राहतील म्हणून त्याच रात्री वस्ती पेटवून दिली..सरपंचाने गावात राहू द्यायला २ लाख मागितले. तहसीलदारांनी घरकुलाची जागा नक्की करून दिल्यावर त्याच रात्री वस्ती पेटवली..जीव वाचवायला हे सर्व गावातून पळून गेले तिसरे प्रकरण नागपूर जिल्ह्यात मौंदा तालुक्यात बाबदेव येथील भरवाड या गाई सांभाळणार्‍या लोकांना मारहाण करून बुलडोझर ने वस्ती उध्वस्त केली .गायीचा चारा जप्त केला व चारा हवा असेल तर २५००० रुपये मागितले. जिहाधिकारी तहसिलदार यांना सांगूनही उपयोग झाला नाही .शेवटी चारा सोडवायचे १० हजा रुपये द्यावे लागले. या तीनही प्रकारात भटक्या विमुक्तांना गावात राहू द्यायचे नाही ,घरे मिळवून देवून कायमचे रहिवासी बनवायचे नाही अशी मानसिकता दिसते व इतके टोकाचे अन्याय मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांच्या जिल्ह्यात होऊन काहीच कारवाई झाली नाही यातून भटक्यांच्या प्रश्नाची तीव्रता व उपेक्षा लक्षात येते..शहरी भागात राहणार्‍या भटक्यांना पोलीस रेल्वे स्टेशन जवळ राहू देत नाहीत.हाकलून देतात.उदगीरला तर त्यांची पालं पेटवून दिली होती. इतका त्रास ते सहन करतात.

रहिवासी दाखला,रेशनकार्ड ही साधी कागदपत्रे नसल्याने भटक्यांना किती यातना सहन कराव्या लागतात याची आपण कल्पनाच करू शकणार नाही. रहिवासी पुरावा नसल्याने रेशनकार्ड मिळत नाही. घरकुल मिळत नाही. कोणतीच शासकीय योजना मिळत नाही.रहिवासी नसल्याने मतदार यादीत नाव नाही आणि मतदार नाही म्हणून गावातील राजकीय कार्यकर्ते यांच्याकडे लक्ष देत नाही. गोंदियाच्या भटके पालावर भंगार वेचून आलेल्या महिला भेटल्या. सकाळपासून भंगार गोळा करून ८० रुपये मिळवले व २५ रुपये किलोचा तांदूळ घेवून आल्या होत्या. रेशनवर २ रु किलो तांदूळ असतो पण रेशनकार्ड नसल्याने यांना भंगार विकून २५ रुपये किलोने तो घ्यावा लागतो. घरकुले गावकरी एकतर यांना देत नाहीत आणि मंजूर झाले तर ज्या जागेवर राहतात ती जागा नावावर नसते. त्यामुळे हक्काचे घर मिळत नाही.. पाण्याची तर परवड बघवत नाही. जवळच्या नळावर जाऊन,विहिरीवर जाऊन पाणी गयावया करून आणायचे..एका वस्तीत तर एक रुपया हंडा भावाने पाणी आणावे लागत होते. महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला तरी शौचालये नसल्याने यात महिलांना खूपच संकोचाने जगावे लागते.

भटक्यांची सगळ्यात वाईट अवस्था ही आरोग्याची आहे. नागपूर जिल्ह्यात उषा गंगावणे ही महिला पालावर भेटली उषाबाईंना एकाचवेळी हृदयविकार, अल्सर आणि किडनीचा विकार आहे. त्यांनी जवळच्या पैशाने अंजिओग्राफी केली .त्यात त्यांच्या हृदयाची झडप नादुरुस्त आहे..मी पुस्तकी भाषेत म्हणालो की शासन मदत देते ना ? त्या शांतपणे म्हणाल्या पण त्याचा खर्च शासकीय मदत वगळता आणखी दीड लाख रुपये लागतील. इतकी रक्कम त्यांच्याकडे नाही म्हणून मग आता त्या केवळ गोळ्या घेतात.गोळ्याच्या खर्चासाठी भंगार गोळा करतात आणि त्यातून औषधे घेतात.. कधीकधी गोळ्या घ्यायलाही पैसे नसतात.अशावेळी खूप छाती दुखते.जीव घाबरा होतो. येशूच्या कृपेने आजार बरे होतात म्हणून उषाबाई ही चर्च मध्ये जातात…भटक्यांच्या आरोग्याची परवड सांगायला हे एकच उदाहरण पुरेसे आहे..
या जगण्याच्या लढाईत शिक्षण खूप मागे पडते. उस्मनाबादमधील १५० घरांच्या वस्तीत फक्त २२ मुले शाळेत शिकत आहे. सर्वात जास्त शिकलेली मुलगी त्या वस्तीत ५ वीत शिकत आहे..आणि संपूर्ण वस्तीत फक्त ३ मुली शिकतात.. प्राथमिक स्तरावर विद्यार्थी शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. पण माध्यमिक स्तरावर गळती होते आहे.. तरीही भटक्यात आता १२ वी पास पदवीधर मुले आहेत पण तेवढ्यावर नोकर्‍या मिळत नाहीत त्यातून पुन्हा एक नैराश्य पसरते…
२५ जिल्हे फिरल्यावर महाराष्ट्रातील सर्वात उपेक्षित,दुर्लक्षित आणि जगणेच पणाला लागलेला समूह हा भटके विमुक्त हाच आहे..ज्यांची अजून नेमकी संख्या किती हे सरकार सांगू शक्त नाही उत्तरे शोधणे तर अजून खूप दूर आहे..

भटक्या विमुक्तात असलेले प्रतिभाशाली कलावंत

गडचिरोलीत भामरागड तालुक्यात ओतनकार भटके पितळ धातुपासून वेगवेगळ्या वस्तु बनवतात. या वस्तु ते कलाकुसरीने बनवतात. मातीचा मोल्ड करतात…ती wax ने cover करून design करतात….पितळेचे कासव,काळवीट असे अत्यंत सुबक तयार करून विकतात पण भांडवल नाही, बाजारपेठ नाही त्यामुळे ते आपले घरगुती स्तरावर करत राहतात.
*****
तुळजापूरजवळ हंगरगा पालावर बहुतेकजण संगीत विशारद आहेत. आम्ही ज्या झोपडीच्या बाहेर बसलो .त्या कुटुंबातील वडील हे तबला वादनाची अलंकार पदवी मिळवलेले होते आणि संगीत विशारद मुलगा गावोगावी भजनाचे कार्यक्रम करतो. संगीत अलंकार असलेला तो वृद्ध कलावंत एका पालावर बघणे क्लेशदायक होते

नेमकं काय करायला हवं ??

भटक्यांच्या प्रश्नावर काम करणार्‍या पुण्याच्या संतोष जाधव यांच्या निर्माण संस्था शासनासोबत सर्व संघटना सोबत घेऊन पुढील मुद्द्यांवर advocacy करते आहे

• सध्या वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणाच्या वास्तव्याचे पुरावे व गृहचौकशी अहवालाच्या आधारे त्यांना जातीचे दाखले द्यावेत
• ज्या गावात ते राहत आहेत त्या जागेचा ८अ उतारा ग्रामपंचायतने द्यावा
• ग्रामपंचायत,पंचायत समिति स्तरावरच्या निवडणुकीत भटक्या विमुक्तांना आरक्षण ठेवले तर त्यांना राजकीय प्रतिष्ठा मिळेल व गावपातळीवरचे प्रश्न सुटू शकतील
• एकाच वेळी रेशनकार्ड,रहिवासी दाखला, मतदारयादीत नाव व बँक खाते देण्यासाठी विशीष आठवडा नक्की करून सर्व सरकारी यंत्रणा राबवून ‘शासन तुमच्या पालावर’ ही योजना राबवून हा कागदपत्रांचा विषय एकदाचा निकालात काढावा
• ३५ किलो धान्य यांना मिळण्यासाठी तातडीने बीपीएल रेशनकार्ड देण्यात यावे
• वसंतराव नाईक सबलीकरण व स्वाभिमान योजना प्रभावी राबवावी व वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात गरजेनिहाय योजना तयार कराव्यात
• जातनिहाय जनगणना करून भटक्यांची लोकसंख्या निश्चित करावी
• ५ एकर जमीन कसायाला व ४ गुंठे जमीन बांधकामाला देण्यात यावी
• अट्रोसिटी कायद्याचे सरक्षण भटक्याना देण्यात यावे
• कला सादर करणार्‍या कलावंतांना लोककलावंत शासकीय मानधन देण्यात यावे

अल्प बजेटची तरतूद

राज्यात भटक्या विमुक्तांची संख्या राज्यात ११ टक्के असूनही बजेटमधील तरतूद फक्त १८०० कोटी आहे. आणि यातील निम्म्यापेक्षा जास्त रक्कम आश्रमशाळा, शिष्यवृत्ती यातच खर्च होते.रोजगार निर्मितीसाठी काहीच तरतूद नाही.
भटक्या विमुक्तांसाठीच्या योजना किती केविलवाण्या बनतात याचे उदाहरण संघर्षवाहिनीचे दीनानाथ वाघमारे यांनी संगितले.भटक्याना घरे मिळावी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०११ ल सुरू करण्यात आली. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात २० घरांच्या ३ वस्त्या म्हणजे ६० घरे प्रत्येक जिल्ह्यात बांधण्यासाठी १० कोटीची तरतूद केली. ३५ जिल्ह्यात ६ वर्षात १२ हजार ६०० घरे व्हायला हवी होती पण फक्त २ जिल्ह्यात मिळून ८० घरे बांधली गेली व निधी अखर्चित आणि भटके पालावरच राहिले

भटके स्थिरावण्याच्या यशोगाथा

• बीड जिल्ह्यातील तिरमलवाडी ही वस्ती कार्यकर्ते वाल्मिक निकाळजे यांच्या पुढाकाराने भटक्यांनी अतिक्रमण करून जमिनी पकडल्या..विहिरीच्या पाण्यावर भाजीपाला केला…आम्ही भेट दिली तेव्हा घरासमोर शेतीतून नुकतेच काढलेले कडधान्य वाळवत होते..ज्या भटक्यांच्या पालावर मागून आणलेल्या भाकरी वाळत टाकलेल्या असायच्या हे बघणे आनंददायक होते
• हिंगोली जिल्ह्यात गणेशपूर गावात ७५ टक्के लोक गोपाळ आहेत. यातील बहुतेकांनी जमिनी घेतल्या आहेत.. त्यात १० एकरापेक्षा जास्त जमिनी असलेले २५ पेक्षा जास्त कुटुंबे आहेत. काहींना सिंचनाची सोय असल्याने ते दोन पिके घेऊ शकतात. कापूस आणि हळदीचे उत्पन्न चांगले उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत..
• निलंगा येथे भटके विमुक्त परिषदेने अन्सारवाडा व निलंगा येथे उद्योग केंद्र उभे केले आहे. गोधड्या शिवणे, पिशव्या शिवणे, झोपण्याची उशी शिवणे ,गाडीतील कुशन शिवणे अशी सुबक उत्पादने तयार करतात .याच परिषदेने अनेक पालांवर पालावरची शाळा सुरु केल्या आहेत. त्यातून मुले शिकू लागलीत.

हेरंब कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here