तालुकास्तरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी आदर्श कार्यप्रणालीचा अवलंब करा.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत

Dr Tanaji Sawant
Dr Tanaji Sawant
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

धर्मादाय रूग्णालयांची माहिती आता आरोग्य आधार ॲपवर

मुंबई दि २३ – राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत तालुकास्तरावर आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी आदर्श कार्यप्रणालीचा अवलंब करावा. आरोग्य सुविधेसाठी तालुका अथवा जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार जिल्हा रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, केमोथेरपी डे-केअर सेंटर, रेडीओ थेरपी ट्रीटमेंट युनीटची मागणी करण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रूग्णालयात वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा यासाठी रूग्णालयांची अद्ययावत माहिती “आरोग्य आधार’ या ॲपद्वारे देण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

मंत्रालयात आज धर्मादाय रूग्णालयांतर्गत सुविधा रूग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्पीटल रजीस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

मंत्री सावंत म्हणाले की, धर्मादाय रूग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. धर्मादाय रूग्णालयाची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी, आरोग्य आधार ॲप रूग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपद्वारे रूग्णांना नजीकचे धर्मादाय रूग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तात्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रूम, आरोग्य दूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच नर्सिंग होम अप्लीकेशनमध्ये रूग्णालय आणि डॉक्टरांचे प्रमाणपत्र यांची त्रयस्थ पडताळणी करण्यात यावी. पदवीची सत्यता तपासणी करण्यात यावी असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केद्र, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, सामान्य रूग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे. केवळ अंतर आणि जिल्हा यानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरज कुमार, धर्मादाय आयुक्त श्री. महाजन यांसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

श्रमिक विश्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here