हमाल माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणणारा 15 जानेवारी 2021 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा,यासह अन्य मागण्यांसाठी मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या वतीने मंगळवार तीन ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
शासनाच्या 15 जानेवारी च्या निर्णयानुसार जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याबाबत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत,या निर्णयामुळे शासकीय गोदामे बंद पडण्याच्या मार्गावर असून कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे शासनाने हमाल माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणणारा हा निर्णय तात्काळ रद्द करावा.हमाल कामगारांची महागाई निर्देशांकानुसार फरक बिलाची रक्कम तात्काळ आधार करावी,सर्व तहसील गोदाम मधील हमाल कामकाज आणि घरपोच वाटपातील हमाली कामकाज करणाऱ्या सर्व कामगारांना माथाडी मंडळातून हमाली व वराई रक्कम अदा करण्यास अडथळा करणारे कंत्राटदार,शासकीय अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करावी दरवाढीची मुदत संपलेल्या सर्व ठिकाणी कामगारांना माथाडी मंडळाचा खंड 32 अन्वे दरवाढ लागू करावी.
या मागणीसाठी मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.मंगळवार 3 ऑगस्ट रोजी हमाल कामगारांनी निदर्शने करीत काम बंद आंदोलन केले.कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉम्रेड अब्दुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात हमाल माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी होते.
श्रमिक विश्व न्युज