बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक, लिपिक लाच घेतांना अटक …

पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी ७५०० रुपयांची लाचेची मागणी.

बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक,लिपिक लाच घेताना अटक.

परभणी : (०३) जिल्ह्यातील शिक्षण विभागच्या भ्रष्ट कार्यपद्धतीचे रकाने वर्तमान पत्रात दर रोज भरून येण्याची श्रंखला एका बाजूला थांबत नसतांना,आता जिल्ह्यातील शासनमान्य शाळांमध्ये प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशन घेऊन पालकांची पिळवणूक होत असल्याचे अधोरेखित होते आहे.

शहरातील बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळा, नानलपेठ भोई गल्ली येथे पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी ७५०० रुपयांची लाचेची मागणी करून ४००० रुपये लाच स्वीकारताना येथील शाळेचा कनिष्ठ लिपिक मोहमद अब्दुल रफी मोहमद अब्दुल रशीद, वय ५४ वर्ष, तथा मुख्याध्यापक एकनाथ कच्छवे, वय ५७ वर्षे, व्यवसाय मुख्याध्यापक बाल विद्या मंदिर(प्राथमिक), नानलपेठ शाखा,परभणी रा.जुना पेडगाव रोड, परभणी याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा लाऊन अटक केली आहे.

बाबत अधिक माहिती अशी की
यातील तक्रारदार यांच्या मुलीचे पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी यातील दोन्ही शिक्षक, शिक्षतर कर्मचारी यांनी ७५००/- रुपयांची लाच मागणी केली म्हणून तक्रार प्राप्त झाली होती.
दिनांक २८ जून रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता यातील बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक व लिपिक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी तडजोडीअंती ५५०० रुपये पंचासमक्ष लाचमागणी केली.

त्यापैकी ४०००/- रुपये दिनांक ०३ जुलै २०२३ रोजी मुख्याध्यापकांनी शाळेचे कनिष्ठ लिपिक यांच्याकडे देण्यास सांगितले. उर्वरित १५००/- रु दीड ते दोन महिन्यांनंतर आणून देण्यास सांगितले.
आज दिनांक ०३ जुलै रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे क्रमांक ०१ यांनी तक्रारदार यांचे कडून ४०००/- लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली आहे. लाचेच्या रकमेसह कनिष्ठ लिपिक यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले. बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यालाही एसीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पो.स्टे.नानलपेठ,परभणी सुरू आहे.

प्रकरणी डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी अशोक इप्पर,पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, परभणी सापळा तपास अधिकारी बसवेश्वर जकीकोरे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो, परभणी.सापळा कारवाई पथक म्हणून पोहेकॉ मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार,पोकॉ  अतुल कदम, मोहम्मद जिब्राईल यांनी काम पाहिले.

श्रमिक विश्व

सचिन देशपांडे : ७०३८५६६७३८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here