१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थानचा निजाम शरण आला व …

इतिहास लिहिताना मात्र कम्युनिस्टांच्या योगदानाची फारशी चर्चा झाली नाही.

0
393

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात फक्त ब्रिटिश राजवटीविरुद्ध नव्हे तर गोव्यातील पोर्तुगीज,पुड्डेचरी व इतरत्र असलेल्या फ्रेंच राजवटी तसेच भारतातील ५७१ संस्थानिकांविरुद्धही लोकशाही स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला.याची फारशी माहिती जनतेपर्यंत जात नाही.या संघर्षात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अत्यंत महत्त्वाची व प्रमुख भूमिका बजावली होती.या संघर्षात हैद्राबाद मुक्ती संग्राम हे अत्यंत महत्वाचे पर्व आहे.१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थानचा निजाम शरण आला व हे संस्थान भारतात विलीन झाले.हैद्राबाद संस्थानाचे तेलंगणा,मराठवाडा व कर्नाटकाचा काही भाग ( बिदर,गुलबर्गा व रायपूर ) असे तीन विभाग होते.या तिनही विभागांत जुलमी निजाम राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य संग्राम झाला व त्यात कम्युनिस्ट पक्षाने भरीव योगदान दिले.

इतिहास लिहिताना मात्र कम्युनिस्टांच्या योगदानाची फारशी चर्चा झाली नाही.उलट दुर्लक्षच झाले.तेलंगणाचा सशस्त्र संग्राम हे कम्युनिस्ट चळवळीचे,शेतकरी चळवळीचे व स्वातंत्र्य चळवळीचेही अत्यंत देदीप्यमान पर्व होते.

सध्या मराठवाडा मुक्ती संग्राम हा हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा एक वेगळा भाग म्हणून पाहण्याची प्रथा पडत आहे.हे वास्तवाला धरून नाही.जाणीवपूर्वक हैद्राबाद मुक्ती संग्रामला धर्मांध रंग देण्याचा प्रयत्न होत आहे.प्रत्येक्षात तत्कालीन चळवळीचे सर्वच नेते व संघटना समतावादी,लोकशाही,धर्मनिरपेक्ष विचारांनी प्रभावित असल्यामुळे या लढ्याला प्रयत्न करूनही हिंदू-मुस्लिम संघर्ष असे व्यापक स्वरूप आले नाही.यात कम्युनिस्टांनी जाणीवपूर्वक कामगार व शेतकऱ्यांचे उभे केलेले मोठे लढे व भूमिका यांचा फार मोठा वाटा आहे.जमीनदारीविरुद्धचा फार मोठा संघर्ष म्हणून तेलंगणाचा लढा ओळखला जातो.३००० खेडी मुक्त करून जमीन वाटप करण्यात आले व त्यामुळेच भारतातील जमीन वाटपाचा प्रश्न राष्ट्रीय अजेंड्यावर आला.

‘कसेल त्याची जमीन’ यासंबंधी कॉ.व्ही.डी देशपांडे यांना हैद्राबाद विधानसभेत ठराव मांडण्याचा व मंजूर करण्याचा मान मिळाला.जमीन सिलिंगचा कायदा त्यामुळे आला व विनोबांची भूदान चळवळ याच कारणामुळे सुरु झाली.हैद्राबादला पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणण्यात आले,यामागे निजाम पुरस्कृत रझाकारांचा हैदोस,निजामाचा स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न या बरोबरच तेलंगणाची चळवळ व कम्युनिस्टांच्या वाढत्या ताकदीची भीती हाही महत्वाचा घटक होता.त्यामुळेच हैद्राबाद झाल्यावर निजामाला ‘तनखा’ दिला गेला.रिझवीला पाकिस्तानात पाठविले तर ५००० कम्युनिस्टांना कंठस्नान घालण्यात आले,हे पण लक्षात घ्यावे लागेल.

जनरल चौधरी यांनी पकडलेल्या कम्युनिस्टांची मानहानी करून पुढाऱ्यांचा पत्ता देण्यासाठी सक्तीने प्रयत्न केले होते.हे मला प्रत्येक्ष तो अनुभव घेतलेल्या व खुल्या तुरुंगात ठेवलेल्या व सक्तीने मजुरी करावयास लागलेल्या पुढाऱ्यांनी सांगितले आहे.भारतीय सैन्याने कम्युनिस्टांवर केलेले अत्याचार कॉ.देशपांडे यांनी पुढे आणले आहेत.हे सर्व आज सांगण्याचे कारण म्हणजे हा सर्व इतिहास लिहिण्याचे कष्ट तत्कालीन नेत्यांनी न घेतल्यामुळे तो फारसा समोर आला नाही.

पक्षाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षाचे एक नेते कॉ.भगवानराव देशपांडे यांनी तो मांडला आहे.आम्ही तो या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेपुढे ठेवत आहोत.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत महत्वाचे पर्व म्हणजे हैद्राबाद मुक्ती संग्राम होता व आहे.कम्युनिस्टांनी या संग्रामातील योगदान अविस्मरणीय आहे,हेच हा इतिहास सांगतो.त्याचे स्मरण राहावे यासाठी हा प्रयत्न.

                    -डॉ.भालचंद्र कानगो

निजामशाहीविरोधात मराठवाड्यातील कम्युनिस्टांचा लढा …ऍड.भगवानराव देशपांडे या पुस्तकातील प्रस्तावना.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here