बांगलादेशमध्ये फळांचे रस बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत ५२ कामगार होरपळून मेले आणि अनेक प्राणांतिक भाजले आहेत.

आग लागलेल्या इमारतीला असणारे बाहेर जाणारे दरवाजे मॅनेजर / मालकाने बंद ठेवले होते त्यामुळे कामगारांना बाहेर जाता आले नाही असा एक आरोप आहे.

फोटो गुगल साभार

एप्रिल २०१३ मध्ये ढाक्यातील राणा प्लाझा हि औद्योगिक इमारत कोसळली त्यात ११०० कामगार मृत्यू पावले आणि २५०० कामगार कायमचे जायबंदी झाले होते ; जगाच्या औद्योगिक इतिहासातील काळा दिवस.

इमारतीला भेगा पडल्याचे माहित असून , अनेकांनी इशारे देऊन गारमेंट कंपन्यांनी कारखाने हलवले नाहीत , ना मालकाने भाडे बुडू नये म्हणून इमारत बंद केली.

आणि हि मालिका सुरूच आहे.


जगात घडणाऱ्या प्रत्येक अपघाताकडे दुर्दैवी घटना म्हणून बघणाऱ्या वयाने प्रौढ पण बुद्धीने ८-१० वर्षाच्या आपल्या मित्रांकडे दुर्लक्ष करू या ; आणि त्यातील राजकीय अर्थव्यवस्था समजून घेऊ या.

बांगलादेशच्या जीडीपी वाढीचे डिंडिम सर्वत्र वाजवले जात आहेत ; पण त्याला एक काळीकुट्ट बाजू आहे.

चीनमध्ये वेतनमान वाढायला लागल्यावर , आणि चीनमधून गुंतवणुकी काढून घेण्याचा राजकीय निर्णय झाल्यावर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बांगलादेश , व्हियेतनाम आणि काही प्रमाणात भारता मध्ये आपले कारखाने हलवले.


त्यांच्या यजमान राष्ट्राला असणाऱ्या अटी वैश्विक आहेत आणि अजिबात क्लिष्ट नाहीत.

कामगार विषयक कायदे असलेच तर कागदोपपात्री ठेवा ; किमान वेतन , कामगारांची सुरक्षितता , अपघात झाल्यानंतर द्यावयाची नुकसान भरपाई , ट्रेड युनियनला मज्जाव , या सगळ्यातून नक्कीच तयार होणाऱ्या असंतोषाला दंडसत्ता वापरून शांत करणे , कोणत्याही पर्यावरणीय कायद्याचा आग्रह नसणे इत्यादी.

या सगळ्याची अमलबजावणी केली तर त्यांचा भांडवली खर्च आणि उत्पादन खर्च वाढतो , त्याप्रमाणात नफ्याची पातळी घसरते.


या देशातील कामगारांपुढे दोनच पर्याय आहेत.

बेरोजगार राहून भुकेने मरायचे , आपल्या बायका मुलांकडे बघत खंगत कुढत राहायचे,
किंवा
जोखडाखाली मान देऊन एखाद्या अपघातात येऊ शकणाऱ्या मृत्यूची वाट बघायची.

कोट्यवधी कष्टकरी स्वतः एवढे पिचलेले आहेत , काळजीने काळवंडलेले आहेत कि ते स्वतःच्या हिताचा विचार करण्याच्या अवस्थेत नाहीत

माझे अपील आहे तरुणांना , विद्यार्थ्यांना , आर्थिक प्रगतीचा विचार फक्त जीडीपी केंद्री करू नका , मनुष्याला केंद्रस्थानी ठेवा ; बाली सारे दुय्यम.

संजीव चांदोरकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here