कोरोना महामारीचे संकट ओसरले पण त्या काळाच्या उदरात गडप झालेल्या मानवी शोकांतिकांच्या अव्यक्त अश्या एक एक कहाण्या मन हेलावून सोडणाऱ्या आहेत…

वीट भट्टी कामगारांच्या कामाचा व्याप आणि मुलांच्या आरोग्याचे,कुपोषणाचे दुष्टचक्र अशी वर्तुळे तयार होतायत.

0
274

परभणी कोरोना महामारीचे संकट ओसरले पण त्या काळाच्या उदरात गडप झालेल्या मानवी शोकांतिकांच्या अव्यक्त अश्या एक एक कहाण्या मन हेलावून सोडणाऱ्या आहेत.एप्रिल २०२१ मध्ये गरोदर असणाऱ्या शबानाने ०४ तारखेला एका मुलाला जन्म दिला.कोरोना प्रार्धुभावाच्या सर्वदूर पसरलेल्या भीतीच्या त्या वातावरणात त्यांना दवाखान्यात नेले गेले नाही,आणि त्यांची प्रसूती घरीच झाली.प्रसूतीच्या वेळी बाळाच्या पोटात इन्फेक्शन झाले,चेहऱ्यावर पण फोड आली नंतर.श्वासोश्वास घायला प्रचंड त्रास व्हायला लागला बाळाला,त्याची छाती ह्रदयाचा ठोक्या गणीस पाठीकडे खड्डा पडे, मग मात्र घरची मंडळी हादरली.

  परभणीच्या कौडगाव रस्त्यावर असलेल्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबाकडून पुढे सांगितलेली हकीकत अशी,मग तात्काळ त्यांनी बाळाला परभणीच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले.एव्हाना घरच्या दारच्यांना बाळ वाचेल म्हणून शाश्वती नव्हती राहिली. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमउपचार करून पुन्हा नांदेडला रेफर करण्यात आले. गाड्या बंद, दळण वळण यंत्रणा जाम झालेली,कोरोनाचा कहर व त्याही पेक्षा अधिक भीती.अश्या स्थितीत पैशाची अडचण,रेफर करण्यासाठी परभणीच्या सरकारी दवाखान्याकडून अम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली नाही.संकटात संधी शोधणारे घटक त्यावेळी सक्रिय झालेले,त्यांना परभणी ते नांदेड अश्या अंशी-नव्वद किलोमीटरवर असणाऱ्या नांदेड वैद्यकीय महाविद्यालयात सोडण्यासाठी तब्बल दहा हजार रूपये ऍम्ब्युलन्सला भाडे भरावे लावले,नांदेडच्या रुग्णालयात आधी पंधरा दिवस आणि पुन्हा एकदा एक महिना असा बाळाचा उपचार झाला,तर दुसऱ्या वेळी देखील तेवढेच भाडे ऍम्ब्युलन्सला खर्च आला.आर्थिक परिस्थिती कमकुवत असणारा वर्ग,त्यात कामं धंदे बंद आणि कोरोना काळात इतर आजाराच्या रुग्णांची अशी स्थिती झाली की हे कुटुंब एकूण चाळीस एक हजार रुपये खर्चून बाळाला वाचवू शकले. शासकीय रुग्णालयात उपचार होऊन ही बाहेरून औषध मागवण्यात यायची,बाळाची आजी सांगत होती.भट्टीच्या मालकाने काही,काही नातेवाईकांनी,शेजाऱ्यांनी आर्थिक मदत केली म्हणून ऐन वेळी झालेला उपचाराचा खर्च करता आला,नाहीतर काय झाले असते ? तिथं शेजारी बसलेली महीला म्हणत होती.
आता बाळाची तब्येत सुधारली आहे,त्याचे नाव आजान ठेवले आहे.
परभणीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातून अनेक रुग्णांना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले जाते.अधून मधून काही घटना घडली तर त्या बाबत ओरड होते.स्थानिक वर्तमानपत्रात बातम्या छापून येतात,आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या …
परभणी शहरात मूळ वास्तव्यात असलेल्या आणि आता कामासाठी पेडगाव शिवारात सहा-सात महिन्यांपासून स्थलांतर करून वीट भट्टीवर काम करत असलेल्या तस्लिम बी सांगत होत्या त्यांची “पोतरी” म्हणजे नात, मुलाची मुलगी उण्या पुऱ्या एक वर्षाची,मुतखड्याच्या आजाराने ग्रस्त आहे.कधी कधी तिचे सर्वांग सुजते.तस्लिमबीचा मुलगा मागच्या एक वर्षापासून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ये-जा करून तिचा उपचार करत आहे,आता पर्यंत जाणे येणे धरून खूप खूप खर्च झाला आहे.किती खर्च आला असे विचारले असता त्या म्हणतात,”हिसाब नही किया,पर देना-लेना भौत हुआ करके यहाँ काम पे आना पडा”
साठ-सत्तर हजार रुपये कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले, त्यांचा मुलगा ही रोज मजुरी करून उदरनिर्वाह करतो.कामाच्या ठिकाणी पाच दहा मिनिटं बोलत असताना त्या अस्वस्थ झाल्या,हुआ क्या तुम्हारा बोलना,काम पे जाने का है’ म्हणून वळल्या मी त्यांना विचारले रेशन कार्ड,लेबर कार्ड वैगेरे आहे का ? तर त्या म्हणाल्या मेरा आधार कार्ड अभी तक बना नही, रहिवासी है !
पहाटे चार-पाच वाजल्यापासून वीट भट्ट्यांवरील कामाला सुरुवात होते,दुपारच्या एक-दोन वाजता जेवणाची सुट्टी होते.त्यावेळेत काय ते बोलायला सवड मिळते. जेवायला सुट्टी होऊन एका झाडाखाली डब्बे उघडुन बसलेले,मघाशी बोलतांना अवघडलेले कामगार आत्ता तरी काही बोलतील म्हणून मग मी त्यांच्या पुढ्यात जाऊन बसलो.दुपारचा डब्बा घरून आला होता. जावेद कुरेशी पेडगाव येथे राहणारा व आता इथे भट्ट्यांवर काम करत असलेल्या मजुराला विचारले लॉकडाऊन मध्ये दवाखान्याचा काही अनुभव आला का ? तर तो म्हणाला मागच्या “रमजान” महिन्या मध्ये 2021 मार्च-एप्रिल मध्ये लॉकडाऊनच्या काळात त्याच्या बायकोला पोटात आतडी मध्ये आजार झाल्याने उपचारासाठी खूप दैना सहन करावी लागलीय.त्याच्या कडे पैसे नव्हते,”सरकारी दवाखाने में कोई लेरा नहीं था,खानगी में भी कोई लेरा नहीं था,हकाल हकाल के देरे थे,तो जेवण करत होता पण कान देऊन माझे प्रश्न ऐकत होता.मी त्याला विचारले “फिर क्या हुआ ? हमारे भौने (भाऊजी) यवतमाल कू रहते,यहाँ से वाहां ले जाके खानगी में ऑपरेशन करें”
   परभणी मध्ये का नाही केला उपचार,असे विचारल्यावर म्हणाला की पैसे नव्हते.इथून मी काही कर्ज काडून आणि बाकीचे त्यांच्या पाहुण्यांनी मिळून पावणे तीन लाख रुपये खर्च आला.
त्याचा बोलतांना आवाज बसला होता, काय तब्येत ठीक नाहीये का,मी विचारपूस केली’ तर म्हणला माझी पण तब्येत चार-पाच दिवसांपासून बरी नाहीये,तिशीत असलेला हा तरुण दवाखान्याच्या खर्चाने कर्जबाजारी झाला आहे.बोलतांना त्याचे सहकारी त्याच्या अवस्थेवर विनोद करत होते,तर तो म्हणाला आता उद्या रविवारी आठवड्याचे पगार पाणी भेटेल,जे काय दीड-दोन हजार रुपये भेटतील त्यात खाणे-पिणे,काही लोकांची उधारी देऊन स्वतःला दवाखान्यात दाखवेल.नाहीतर देणेदार मारायला येतायत !
अचानक उद्धभवणार्या गंभीर आजाराच्या परिस्थितीत उपचारा वेळी कामगाराच्या होणाऱ्या अवस्थेचे खाजगी वैद्यकीय सेवांचे,शिवाय सरकारी आरोग्य व्यवस्थेचे अनुभव सुद्धा अत्यंत विदारक आहेत.पूर्वी कटलेरी-जनरल सामानाचा गाडा चालवून फेरीवाला असलेला आणि आता एका आजाराने वैद्यकीय खर्चामुळे कर्जबाजारी झालेला शेख शफी.मूळचा वसमत येथील रहिवासी,आता परभणीच्या ब्राम्हणगाव शिवारात असलेल्या वीट भट्ट्यांवर कामाला आहे.कोरोनाच्या महामारी पूर्वी त्याला मुतखड्याचा आजार झालेला,मुतखड्याच्या मुळे लघवीच्या जागीची नस फाटली.अनेक ठिकाणी उपचार करावा लागला.नातेवाईकांच्या आधारे शेवटी लातूर येथे शासकीय रुगणल्यात उपचार केले.शफी भाई आता पन्नाशीत असेल,तो सांगत होता, उपचाराच्या खर्चापायी कटलेरी गाडा गेला,सर्व सामान गेले तरी खर्च भागेना, मग मस्जिदीत चंदा केला.भावाने एक लाख रुपये खर्च लावले,आप्तजन,मित्र परिवाराकडून पैसे उभे केले.अडीच लाख रुपये खर्च झाला. सरकारी दवाखान्यात उपचार केले तरी’ मी विचारले, तर म्हणाला रोज अकराशे रुपयांचे इंजेक्शन बाहेरून आणावे लागायचे,एकदा मुंबईला नेऊन आणावे लागले,सरकारी असला तरी खर्च आला,त्याचे म्हणे आले.आता परभणी मध्ये भाड्याच्या घरात राहतो,सतराशे रुपये घर भाडे,आठवड्याला दोन-अडीच हजार रुपये मजुरी मिळते,त्यात घर भाडे,घर खर्च वैगरे करून थोडे थोडे पैसे कर्ज फेडत आहे.
वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची स्थिती मोठी बिकट पहायला मिळते.पोषण आहार, वैद्यकीय सेवांची सुविधा नसल्यात जमा.अधिकांश ठिकाणी नवरा बायको जोडीने कामाला, त्यात गर्भवती महिला,गर्भवती असतानाच्या काळातील वैद्यकीय सेवा मूळ गावातून स्थलांतर झाल्याने भेटत नाहीत.पोषण आहाराची पण स्थिती अशीच आहे.आरोग्य सेवांचा त्यांचा अनुभव गाठी असला तरी प्रकाशाने आठवून सांगणे कठीण होते.अनेक वीट भट्ट्यांवर जेंव्हा स्थानिक आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर मातांच्या तपासणी साठी किंव्हा आरोग्य तपासणी शिबीर होतात का,असे विचारल्यावर कधीच कोणी येत नसल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे पोषण आहाराची दैना,त्यात कामाचा व्याप आणि मुलांच्या आरोग्याचे,कुपोषणाचे दुष्टचक्र अशी वर्तुळे तयार होतायत.
खळी पाटी पासून थोडं पुढे गेल्यावर गोदावरी नदीच्या पाटाच्या आधाराने वीटभट्ट्यांचे कामे चालली आहेत,सलग खेटून असलेल्या मोठ्या भूभागावर रस्त्याच्या कडेला भट्ट्यांवर अनेक कुटुंब तिथेच राहून काम करतात.शेजारी वीट भट्ट्यांचे गुर्हाळ चालू,त्यातून येणारा धूर,तिथे बाजूला छोटी छोटी अस्थायी विटांची तात्पुरती उभारलेली घरे आणि मुलं-बाळ अंगणात खेळतायेत.वीट भट्ट्यांवर विटा-माती-राख-इतर सामुग्री ने-आन करण्याचे काम करणारा टेम्पो चालक राजू जाधव.2018 साली त्याच्या पत्नीची गंगाखेड येथील खाजगी केंद्रे हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली.मुलगी झाली, भट्ट्यांच्या ठिकाणचे जीवनचक्राचे परिणाम मुलगी जन्मतः कुपोषित असल्याने परभणी शासकीय रुग्णालयात नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात बच्चूला शरीक करण्यात आले.परभणी येथे उपचारा दरम्यान बाळाच्या उजव्या हाताला लावलेली सुई चुकीची लागल्याने कोपरा खाली जखम झाली आणि परभणी जिल्हा रुगणालाय प्रशासनाने बाळाचे ह्रदयाचे ठोके वाढतायेत म्हणून नांदेड येथे रेफर केले.मुलीची आई सोनाली सांगत होती.
  आमचा ह्यांना दारुतून सूद नव्हती, तशीच सही केली”बाळाच्या उजव्या हाताची जखम एवढी गंभीर झाली की पुढे हाताच्या जखमेतून रक्त,पू यायचा.आम्ही पोरगी देवाच्या नावाने सोडून दिली होती.त्यात बाळाचा हात कोपरा खालून तोडावा लागला.आता चार वर्षाची ही “दुर्गा”माझा पुढं येऊन उभी राहिली तिला दोनच हातांपैकी ही एक हात नाही.
  तिच्या आईला मी विचारले,”इचे नाव अंगणवाडीत आहे का ? तर त्या म्हणाल्या महातपुरी गावाच्या अंगणवाडीत नाव नोंदवलेले आहे,पण पोषण आहार मिळत नाही.आता अंगणवाडी ताईला फोन केला तर आमचा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला आहे.इथं मुलांचे वजन मोजायला ही कोणी येत नाही,कामाच्या ठिकाणी आशा वर्कर,नर्स,मलेरिया डॉक्टर ( MPW ) समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या पैकी कोणी येत नाही,काही सेवा भेटत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
श्रमिक विश्व रिपोर्ट 
सचिन देशपांडे,
साथी हेल्थ कम्युनिकेटर,
परभणी व हिंगोली जिल्हा,
मो.7038566738

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here