प्रभाग १६ : सारे गाव मामाचं… पण एक नाही कामाचं !

    साखला प्लॉट वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था कायम

    परभणी : ( दि.१६) “सारे गाव मामाचं आणि एक नाही कामाचं” ही जुनी उक्ति परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये अक्षरशः खरी ठरत आहे.साखला प्लॉट भागातील वसाहतींना शहराशी जोडणारा मुख्य रस्ता इतका खराब अवस्थेत आहे की, पावसाळ्यात चिखल आणि पाणथळीतून तर उन्हाळ्यात धुळीच्या ढगातूनच नागरिकांना प्रवास करावा लागतो. गेली कित्येक वर्षे या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचा वातावरण निर्माण झाला आहे.

    नेते, कार्यकर्त्यांची भाऊगर्दी केवळ समाज माध्यम आणि बॅनरवर

    या प्रभागात विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची अक्षरशः भाऊगर्दी असली तरी जनतेच्या मूलभूत सुविधांकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही.रस्त्यावर मोठमोठे खड्डे, तुटलेली सिमेंटची पट्टी, नाल्यांमधून ओसंडून रस्त्यावर येणारं पाणी यामुळे या मार्गाने जाणं नागरिकांसाठी धोक्याचं ठरतं.शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि महिला यांना विशेषतः मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं.
    निवडणुकीच्या काळात ‘विकासाचे गाजर’ दाखवणारे, घरोघरी भेटी देणारे आणि मोठमोठी आश्वासने देणारे प्रभागातील लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, ही वस्तुस्थिती नागरिकांच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. ‘फोटोसेशन’साठी तत्पर असणाऱ्या नेत्यांनी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मात्र कधीही उभं राहून फोटो काढला नाही, अशी नागरिकांची बोचरी टीका सुरू आहे.

    यामुळे, प्रभागातील जनतेत एकच सवाल घुमू लागला आहे – “सारे गाव मामाचं, पण एक नाही कामाचं” अशा परिस्थितीत आमच्या नेत्यांच्या भाऊगर्दीचा नक्की उपयोग तरी काय?

    पावसाळ्यात चिखल, दलदल, पाण्याचे डोह तर उन्हाळ्यात धुळीची वादळं – हेच या रस्त्याचं ओळखपत्र. खड्डे इतके खोल की, त्यात मासेमारीचा व्यवसाय चालू करता येईल. तरीही प्रभागातील ‘जनसेवक’ मंडळी शांत, कारण या खड्ड्यांवर अजून निवडणूक चिन्ह उमटलेलं नाही.
    स्थानिक नागरिक म्हणतात, “नेत्यांची भाऊगर्दी आहे खरी,पण उपयोग शून्य.फोटो काढायचे असतील तर नेते मिळतील, पण रस्ता बनवायचा असेल तर देवही सापडणार नाही.”
    प्रश्न एवढाच आहे – नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, पक्ष आहेत… मग रस्ता का नाही?

    श्रमिक विश्व

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here