मुले पळवणारी टोळी आली असले मेसेज forward सुरू आहे.हा प्रकार अत्यंत जीवघेणा आहे. Forward करण्यापूर्वी या घटना आठवा म्हणजे त्यानंतर कधीही असे गरीबांचे जीव घेणारे मेसेज मग कधीही फॉरवर्ड करावेसे वाटणार नाही–
१) जानेवारी २०१७ ते जुलै २०१८ या दीड वर्षात मुले पळवतात अशा संशयावरून अशा प्रकारचे जमावाकडून ६९ हल्ले झाले त्यात ३३ जण मारले गेले तर ९९ जखमी झाले इतके हे भीषण आहे
२) २०२० मध्ये मुंबईत एका मंदिरात राहणारे साधू त्यांच्या गुरूंच्या अंत्यसंस्काराला सुरत येथे जात असताना पालघर जिल्ह्यात या साधूंना जमावाने मारले ही घटना अवघी दोन वर्षांपूर्वीची आहे.केवळ संशयावरून बिचारे निष्पाप साधू मारले गेले. त्या परिसराशी काहीही संबंध नसताना केवळ प्रवास करताना त्यांना मारले आहे.
३) सर्वात वेदनादायक मृत्यू हा धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील होता.भिक्षा मागायला आलेले ५ भटके बाजारात आले.त्यापूर्वी अनेक दिवस मुले पळवून नेण्याचे मेसेज पडत होते.जमावाने त्यांना मारायला सुरुवात केली आणि ग्रामपंचायत कार्यालयात बेदम मारहाण करून मृत्युमुखी पडले. बिचारे सगळे तरुण होते.मी त्यांच्या घरी मंगळवेढा तालुक्यात जाऊन आलो तेव्हा कुटूंबाची परवड बघितली
४) २०१२साली नागपूर शहरात अशाच अफवा पसरत होत्या.बुलढाणा जिल्ह्यातील ३ बहुरूपी वेगवेगळ्या सोंगांचे मुखवटे लावून एका कॉलनीत आले आणि कुजबुज सुरू होऊन मारहाण सुरू झाली.दगड मारायला सुरूवात झाली. पोलीस आले तर पोलिसांच्या गाडीतून बाहेर ओढून या बिचाऱ्याना ओढून काढून लोकांनी दगडांनी मारले….तिघेही मारले गेले.
५) कर्नाटकमधील बिदर मध्ये अतिशय सुशिक्षित ३ तरुण एका धरणाजवळ थांबले व शाळेतून परत जाणाऱ्या मुलांकडे त्यांनी चॉकलेट फेकले तर मुलांचे पालक लगेच जमा झाले.मारहाण सुरू झाली व पुढील गावात ही whatsapp मेसेज गेले तिथेही लोकांनी मारले.शेवटी गाडी एका खड्ड्यात फसली तर लोकांनी वरून दगड फेकले व उच्चशिक्षित तरुण ठार झाला
६) तामिळनाडूत एक कुटुंब एका ठिकाणी देवदर्शनासाठी जात असताना त्यांनी पत्ता विचारण्यासाठी थांबले व लहान मुलांशी बोलले तर संशयावरून मारहाण झाली.त्यात त्या कुटुंबातील महिला मृत्यू पावली.कुटुंब असूनही सुटले नाहीत
७) मतिमंद असलेल्या महिलेला तिरुवल्लूर येथे बेदम मारहाण करण्यात आली त्यात तिचा एक डोळा निकामी झाला व नाक तुटले
८) पारधी कुटुंब तर अनेकदा बळी पडते. पहाटे गावाजवळून जाणाऱ्या पारधी तरुणांना नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात ग्रामपंचायत समोर आणून अत्यंत क्रूर मारहाण झाली होती त्यात दोन मृत्यू झाले होते.
जे देशाला कोट्यवधीनी लुटतात ते परदेशात पळून जातात आणि काहीही गुन्हा नसलेले पोटासाठी गावोगावी कला दाखवत फिरणारे असे मारले जातात
तेव्हा आपला एखादा forward मेसेज एखाद्याचा जीव घेईल याचे भान असू द्या