वीटभट्टी कामगारांच्या आरोग्य,पोषण स्थितीचा श्रमिक विश्व रिपोर्ट …

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात कष्टकऱ्यांच्या बाजू !

कोरोनाच्या आजारातून नीट झाल्यावर दहा दिवसांनी सुट्टी झाली तर संगची माणसं लागली ना रडायला, म्हणत होती तुम्ही बरे झाले पण आमचं काय होतं कायनू ?

मानवत-पाथरी रोडवर वीट भट्ट्यांवर वसमत तालुक्याच्या रांजूना गावातून कामाला आलेल्या लेकीच्या घरी,सध्या भेटायला आलेले बाबा,त्र्यंबक नारायण मुळे हे सत्तरी पार केलेले वृद्ध त्यांच्या कोविड काळातील शरीक असतानाचा अनुभव सांगत होते.परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कुपा या गावचे मूळ रहिवासी आणि ऊस तोडीवर बायको मुलांसह माजलगाव तालुक्यात राहत असलेले त्र्यंबक मुळे बाबाला विचारलं “ही कोरोना बिमारी काय होती” तर सांगत होते ही बिमारी डॉक्टराला कळना, मजूर तरी बरे झाले, पण श्रीमंत इंजेक्शनने मेले’ शुगर, बिपी नव्हती म्हणून वाचलो, अश्या हवेला राहिल्याने म्हणून त्यांनी रानाकडे हात दखवला.

श्रमिक विश्व फोटो


 त्यांचं म्हणणं आलं की मजुराच शरीर कष्ट करून आणि रानात जिंदगी गेल्याने प्रदूषण रहित हवा मिळाल्याने त्यांना कोणता आजार नाही झाला,त्यामुळे कोरोनातून वाचले.कोरोनाच्या काळातील आठवणी सांगताना माणसं जरास खोकल की धूम पळू लागले,पाण्याच्या नळाला हात लावू देईना गेले की काय नाही”. कोरोना वाऱ्यातून आला ते म्हणत होते.त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने वडवणी च्या कोरोना सेंटर मध्ये ऍडमिट केलेलं.दहा दिवस खूप चांगला उपचार झाल्याचे सकाळ-दुपार-संध्याकाळ गोळ्या,अंडे,जेवणं अशी सोय होती.आता दीड वर्षे झाले या कालचा पाडवा जाऊन त्याच्या आधीच्या पाडव्याला अस कॅलेंडर त्यांनी ध्यानात ठेवलं होतं.रोजगार बंद होता तर मग कशी गुजरान झाली या बाबत “असच” हे ठरलेले उत्तर देऊन,एक टाईमाला खायचो एक एक टाईम काही नाही भेटलं !


या भट्टीवर एकाच गावातील तीन-चार कुटुंब मुलंबाळांसह कामावर स्थलांतर करून आलेले,वसमत तालुक्यातील रांजुना गावचा तरुण पिराजी,विटां तयार करण्यासाठी मातीचा चिखल करत असतांना त्याला विचारले,कधी पासून काम करता तर म्हणला,काही सांगायचं नाही,”कोणी काही देत नाही,नुसतं नाव लिहून नेत्या”कामाच्या ठिकाणी शासनाच्या विविध विभागाचे लोक येऊन सरकारी दप्तर अपडेट करण्याची सोय करता असा त्याच्या संतापाचा भावार्थ होता,तो खरा ही होता.पुढे काही भट्ट्यांवर नोंदणी करता लोक आली आणि पुन्हा काही भेटलं नाही असं अनेकांनी सांगितलेले.


कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात सुरुवातीचे लॉकडाऊन घोषित झाले तेंव्हा मार्च 2020 भट्ट्यांचे काम जवळपास संपत आले होते,ज्या वीट भट्ट्यांवर माती-राख अशी इतर ठिकाणावरून वाहनाने आणायची सामग्री शिल्लक होती तिथे काही प्रमाणात कामे चालू होती.गाड्या मोटरा बंद होत्या त्या कारणाने कामे अनेक ठिकाणी प्रभावित झाली.

श्रमिक विश्व फोटो


एका कुटुंबातील दहा पेक्षा अधिक लोक लॉकडाऊन मध्ये इथे मानवत-पाथरी रोडवर कामाला होती.दीपक काजळे सांगत होता,त्यांना रेशन मिळत होते पण गावाकडे,गावात आई रेशन उचलते.कोरोना काळात दवाखाण्याचा काही अनुभव आला का ? या वर तो म्हणाला वसमतच्या जय नगर भागातल्या सरकारी दवाखान्यात जातात.तो बोलता बोलता त्यांना शेती-बाडी नाही,रोज मजुरी करून कमवायचे आणि खायचे ! नियत साफ है आपली म्हणून आपल्याला कोरोनाच्या महामारीत काही झाले नाही”,अस म्हणाला.दोन मुलं,पत्नी असा परिवार घेऊन तो भट्टीवर कामाला होता,मुलगा पण काम करत होता.मोठा मुलगा बारा-तेरा वर्षाचा,लहान मुलगी एक वर्षाची आहे.मी त्यांना त्यांच्या पत्नीला बोलायचे आहे म्हणून तिथे भट्ट्यांच्या कडेला बांधलेल्या विटांच्या घराकडे नेले.संगीता काजळे या बाई बोलयाला आल्या,वय आणि शरीराची ठेवण सगळं सांगून गेली.एक वर्षाची असलेल्या लहानग्या मुलीचा जन्म परभणीच्या सरकारी दवाखान्यात झालेला.लहान मुलगी पोटात असतांना तुम्ही कुठे होता,कुठे उपचार घेतला असे विचारले असता,त्या म्हणाल्या त्यांच्या गावाकडे नोंदणी केलेली पण पोषण आहार भेटला नाही,नऊ महिने करावयाचा उपचार झाला होता का ? एक-दोन वेळा दाखवलेलं अस त्यांनी लक्षात आणून सांगितले.आता एक  वर्षाची मुलगी आहे हिचा पोषण आहार,लसीकरण उपचार कुठे करता,तर पोषण आहार नाही भेटात पण लसीकरण करायला कधी कधी लोक येतात,अस त्यांनी सांगितले.एकदा रत्नापुर म्हणून बाजूला असलेल्या गावातून आंगणवाडीचा खाऊ मिळाला होता. पण पुन्हा आम्ही गेलो नाही आणि तेही आले नाही.गर्भवती,स्तनदा मातांच्या वीट भट्टीवरील कामाच्या ठिकाणी कामाची वेळ आणि पोषण आहार सुरक्षेची स्थिती एकूण भयाण पणे समोर येते.


वीट भट्ट्यांवर अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील तथा मागासवर्गीय समाजाची कामगार संख्या सर्वाधिक आढळते. कोरोना काळात रोजगाराच्या,आरोग्य पोषणाच्या संदर्भात परिस्थिती समजून घेण्यासाठी कामगार एखादी विशिष्ट घटना असेल तरच अधिक बोलतात अन्यथा मोघम उत्तरे देत असल्याची प्रचिती येते.काळपरत्वे विस्मृति जागवणे सहज शक्य होत नाही.पण वर्तमानातील पोषण, रोजगार,आरोग्य सुविधांची स्थिती या बाबत ते बोलतात.


पाथरी शहरात इंदिरा नगर भागातील शेख शफी हा त्याच वीट भट्यांवर काम करणाऱ्या मजुराच्या पत्नीला विचारले,लॉकडाऊन मध्ये रोजगाराचे काय साधन होते तर त्या म्हणाल्या त्यांचे “शौवर” म्हणजे पती तर घरीच होते. बाहेर कुठे जायला काही काम नाही,गडी माणसाला” मग त्या अत्यंत बिकट परिस्थितीत पण मी दिडशे रुपये रोजाने शेतात कामाला जायचे,रोशन बेगम सांगत होत्या,त्यांनी घर चालवले.चार मुलं, एक मुलगा,तीन मुली.आता मुलगा पण कुठे कामाला आहे.मोठी मुलगी अरबी शिक्षण घेऊन लॉकडाऊन मध्ये घरी आणली.त्या म्हणत होत्या आता मुलगी मोठी दिसू लागल्याने ते जे अरबी शिक्षण होते ते पण बंद केलं, कोरोना काळात कोणाला आजार झाला नाही पण कुटूंबाची मोठी आर्थिक वाताहत झाल्याचे त्यांनी सांगितले.मधल्या दोन मुली अजून दारूल-उलम नावाने चालणाऱ्या मदरशात शिकत आहेत.त्यांना प्रत्येकी तेरा हजार रुपये,असे दोघींना सव्वीस हजार रुपये वर्षाला भरावे लागतात. पोषण आहारा बाबत त्यांचे म्हणणे आले की अंगणवाडी मध्ये लहानग्या मुलीच्या वेळी नोंद होती पण आम्ही असे कामासाठी स्थलांतर करतो,शिवाय आमच्या कडे रेशन कार्ड पण नाहीये.त्यांना रेशन कार्ड काडून देतो म्हणून अनेक वेळा पैसे घेऊन फसवले गेल्याने आता त्यांना संताप येत होता.लेबर कार्ड साठी पण कोणीतरी अकराशे रुपये घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितले.रेशन अल्प किंमतीत भेटते,सरकार गरिबांना मोफत रेशन देते म्हणून कामगार काम करत नसल्याची एक ओरड असतांना अनेक ठिकाणी कामगार कुटुंबाकडे रेशन कार्ड नसल्याचे ही समोर येते.या कोरोना काळाच्या परिस्थितीत त्यांना सत्तर हजार रुपये कर्ज झाल्याचे त्या म्हणाल्या,मुलींच्या नावाने लॉकडाऊनच्या आधी एक हजार रुपये येत होते,ते ही नंतर बंद झाले आणि त्यांच्या पासबुकवर पण काही भेटले नाही असे रोशन बी यांनी सांगितले.

श्रमिक विश्व फोटो


वीट भट्टीवरील बहुतांश कामगारांवर कर्ज आहे.लॉकडाऊन मुळे दोन वर्षाचे गणित बिघडले आहे.गेल्या वर्षी घेतलेली उच्चल या वर्षी फेडायची,चालू कामात दोन-अडीच हजार रूपये असी आठवड्याला मजुरी मिळते,त्यात काही उच्चल फेडून उरलेल्या पैशात घर खर्च,दवा-दारू, घरभाडे,शिक्षण असा इतर खर्च भागवायचा.गेल्या दोन वर्षातील हंगामात कामाचे दिवस भरपूर भरले नाही,परिणामी आधीच्या वर्षीची उच्चल आणि काम बंद आतांना घेतलेली उधारी अशी स्थिती चालू वर्षात आहे.
गंगाखेड जवळ असलेल्या वीट भट्ट्यांवरील मजुरी काम करणाऱ्या कचरूबा गायकवाड यांनी सांगितले की कोरोना काळात वीटभट्टी मालक पैसे देईना,दवाखान्याला,दोन वेळच्या खाण्याला पैसे नाहीत तर पाच टक्के व्याजाने कर्ज काढले.किलो भर पीठ आणून भाकरी करायची अशी गुजराण केली.आता पण अंशी हजार रुपये कर्ज आहे.त्यात अठराशे रुपये महिन्याला व्याज द्यावे लागते.तुम्ही आता हे लिहून नेत आहेत तर काही मदत करतील का ? असं ते विचारत होते !

श्रमिक विश्व रिपोर्ट


सचिन देशपांडे,

साथी हेल्थ कम्युनिकेटर,
परभणी व हिंगोली जिल्हा.

मो.7038566738

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here