एनडीटीव्ही (अनेक वचनी) ताब्यात घेण्याचे त्यांचे अन्वयार्थ हे असे आहेत …!

    आकडेवारी स्वतःहून गोळा करणाऱ्या यंत्रणा आपण उभ्याच केल्या नाहीत

    गौतम अदानी यांनी प्रणव आणि राधिका रॉय यांच्या एनडीटीव्ही मध्ये भरीव भांगभांडल विकत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे याची बातमी आली ; पहिला प्रश्न मनात येतो कि अदानी यांच्याकडे एवढे पैसे कोठून येत आहेत ?

    आणि त्याचवेळी पूर्ण अदानी समूहावर असणाऱ्या कर्ज डोंगराबद्दल फीच या क्रेडिट रेटिंग कंपनीचा अहवाल देखील प्रसिद्ध झाला आहे

    बंदरे , विमानतळ, अन्नपदार्थ , वीज , धातू , रस्ते , सिमेंट ….. तुम्ही नाव घ्या आणि अदानी समूह त्यात शिरत असल्याचे दिसेल ; अजून एखादा उद्योग या यादीत नसेल तर उद्या येईल , कारण अदानी यांचे साम्राज्य आता तर वाढू लागले आहे

    यातील अनेक क्षेत्रातील प्रवेश हा अस्तित्वात असणारी / असणाऱ्या कंपन्या विकत घेण्याच्या प्रक्रियेतून झाला आहे. त्यासाठी अक्षरशः हजारो कोटी / डॉलर्स नगद मोजावे लागले आहेत

    उद्योग / कंपन्या विकत घेण्यासाठी लागणारे पैसे अदानी यांनी त्याच्याकडे असणाऱ्या कंपन्यांच्या कॅश फ्लो मधून फारसे उभारलेले नाहीत ; तर बँकिंग / रोखे बाजारातून उभे केले आहेत
    ___________________
    आज घडीला अदानी समूहाच्या ६ सूचिबद्ध (लिस्टेड) कंपन्यांनी २,३०,००० कोटी रुपयांची कर्जे काढली आहेत ; जी कोणताही निकष लावला तरी खूप जास्त आहेत असे विश्लेषक सांगतात

    कंपनीवर असणारे कर्ज जास्त कि कमी यांचे अनेक निकष आहेत ; त्यातील प्रमुख कर्ज आणि भागभांडवलाचे गुणोत्तर ; ज्याला डेट इक्विटी रेशो म्हणतात. अदानी यांनी जय प्रमाणात कर्जे उचलली त्याप्रमाणात आपल्या कंपन्यांमध्ये नवीन भागभांडवल ओतलेले नाहीये

    खरेतर हे वाक्य उलटे पाहिजे : बँका / वित्तीय संस्थांनी त्यांना २,३०,००० कोटी रुपये कर्जे दिली आहेत

    म्हणजे अव्वाच्यासव्वा कर्ज घेणारा एकटा दोषी नाही ; कर्ज देणाऱ्या बँका / वित्तसंस्थांना देखील जबाबदार आहेत

    या बँका / वित्तसंस्था प्रोफेशनल्स चालवतात , कर्ज मंजूर करताना अजर्दार कंपनीची / उद्योगसमूहाची जन्मपत्री तपासणे अपेक्षित असते ; काय लिहीत असतील हे प्रोफेशनल्स कर्ज मंजुरीसाठी शेफ़ारस करतांना ?

    कोणाचे कोठून फोन जात असतील ; कोण कोणाला भेटून शिफारस करत असेल ?
    ____________________

    अदानी समूहाच्या ६ सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य २० लाख कोटींच्या आसपास आहे ; त्यांनी मुकेश अंबानी समूहाला कधीच मागे टाकले आहे ;

    आपल्या कंपन्यातील फुगलेले शेअर्स अदानी बँकांकडून कर्जे घेताना गहाणखत लिहून देत असतील ; पण शेअर्सचे बाजारमूल्य शेवटी कागदोपत्री असते ;

    भूतकाळात भारतीय बँकांकडे कर्ज घेणाऱ्या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी गहाण टाकलेले हजारो कोटींचे शेअर्स रद्दी म्हणून देखील कोणी विकत घेतले नाहीत हा इतिहास आहे ;

    ज्याचा उल्लेख कधीही मीडियात येणार नाही ; एनडीटीव्ही सारख्या मीडियात येऊ शकला असता पण असे सर्व एनडीटीव्ही ते विकत घेणार आहेत
    _________________
    लक्षात घ्या बँका / वित्तसंस्था समाजातील बचती गोळा करून त्याच कंपन्यांना कर्जे म्हणून देतात ; तो काही त्याचा स्वतःचा पैसा कधीच नसतो ; हा आपला पैसा आहे हे ठेवीदारांना कळायला अजून काही शे वर्षे जावी लागणार असे दिसते !

    आपला प्रॉब्लेम असा आहे कि मुख्यप्रवाहातील कॉर्पोरेट / वित्त क्षेत्रात चालणाऱ्या घडामोडी , आकडेवारी स्वतःहून गोळा करणाऱ्या यंत्रणा आपण उभ्याच केल्या नाहीत ; त्यांनी पुरवलेल्या माहिती / आकडेवारीवर आपण आपली टीका बेस करतो ;

    ती माहिती / आकडेवारी गुलदस्त्यात राहिली तर फक्त सगळे दिसत असून / कळत असून आपल्या टीकेला धार अनु शकणार नाही ; एनडीटीव्ही (अनेक वचनी) ताब्यात घेण्याचे त्यांचे अन्वयार्थ हे असे आहेत.

    संजीव चांदोरकर 

    श्रमिक विश्व न्युज

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here