Home आरोग्य नवीन रुग्णालय नियमन विधेयक म्हणजे रुग्ण हक्कांवर घाला; –जन आरोग्य अभियान

    नवीन रुग्णालय नियमन विधेयक म्हणजे रुग्ण हक्कांवर घाला; –जन आरोग्य अभियान

    कॉर्पोरेट रुग्णालयांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

    मुंबई :(दि.३ ऑगस्ट) महाराष्ट्र शासनाने संयुक्त समितीकडे पाठविलेल्या ‘महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना (नोंदणी व नियमन) विधेयक, २०२६’ या मसुद्यावर जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. हे विधेयक रुग्णांच्या संरक्षणासाठी नसून त्यांच्या विद्यमान हक्कांवर गदा आणणारे, नोकरशाहीला अनिर्बंध अधिकार देणारे आणि मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांना लाभदायक ठरणारे असल्याचा आरोप अभियानाने केला आहे.
    अभियानाच्या निवेदनानुसार, २०२१ च्या महाराष्ट्र शुश्रूषागृह नियमांमधील अनेक महत्त्वाचे रुग्ण हक्क नव्या विधेयकातून वगळण्यात आले आहेत. बिल न भरल्यास रुग्ण अथवा मृतदेह अडवून ठेवण्यास बंदी, डॉक्टरांची पात्रता जाहीर करणे, एचआयव्ही रुग्णांवरील उपचारांचा हक्क, महिला रुग्णांच्या तपासणीतील संरक्षण, योग्य डिस्चार्ज कार्ड देणे यांसारख्या मूलभूत तरतुदी हटविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

    रुग्ण संरक्षण, दर नियंत्रण, तक्रार निवारण व जनप्रतिनिधित्वाच्या तरतुदी वगळल्याचा आरोप; विधेयकात व्यापक सुधारणा करण्याची मागणी.

    निवेदनात पुढे म्हटले आहे की, केंद्राच्या Clinical Establishments Act मधील दर नियंत्रण, मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वे (STGs) आणि राष्ट्रीय रुग्ण हक्क सनद यांचाही विधेयकात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अवाजवी बिल आकारणी, अनावश्यक तपासण्या व उपचारांना आळा बसणार नसल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
    रुग्णांच्या तक्रारींसाठी असलेली तक्रार निवारण यंत्रणा पूर्णपणे हटविण्यात आली असून, राज्य परिषदेत रुग्ण, नागरी समाज, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ किंवा डॉक्टर संघटनांना प्रतिनिधित्व न देता केवळ अधिकारीवर्गालाच स्थान देण्यात आल्याचा आरोपही अभियानाने केला आहे. जिल्हास्तरावर स्वतंत्र बहु-घटक परिषद व प्रभावी नियामक यंत्रणाही नसल्याने संपूर्ण व्यवस्था नोकरशाहीकेंद्रित होणार असल्याचे अभियानाचे मत आहे.
    जन आरोग्य अभियानाने शासनाकडे विधेयकात व्यापक सुधारणा करून रुग्ण हक्कांचे संपूर्ण संरक्षण, प्रमाणित दर नियंत्रण, मानक उपचार पद्धती, प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था, रुग्ण व नागरी समाजाचे प्रतिनिधित्व आणि स्वतंत्र पूर्णवेळ वैद्यकीय आस्थापना आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली आहे. अन्यथा हे विधेयक महाराष्ट्रातील रुग्णांचा विश्वासघात ठरेल, असा इशारा अभियानाने दिला आहे.

    श्रमिक विश्व

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here