
परभणी ( दि.२४ ) जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळून तीन वर्षांहून अधिक कालावधी उलटला असून संस्था आता चौथ्या वर्षात प्रवेश करत असताना, प्रत्यक्षात उपचार सेवा अजूनही तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्यात आलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयावरच अवलंबून असल्याचे चित्र समोर येत आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही नव्या संस्थेला सुरुवातीच्या काळात इमारत, प्रयोगशाळा, उपकरणे, अध्यापन व्यवस्था आणि मनुष्यबळ उभारणीसाठी काही कालावधी लागणे स्वाभाविक मानले जाते; मात्र या कालावधीनंतरही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या तज्ञ डॉक्टरांचा उपचार प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नगण्य किंवा शून्य असल्याचे आरोप गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहेत.
माहिती अधिकारातून उपलब्ध माहितीनुसार, परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठात्यासह प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांची संख्या 26 दाखविण्यात आली असून त्यांना व्यवसायरोधी भत्ता (Non-Practicing Allowance) देखील दिला जात आहे. तथापि, या तज्ञांपैकी नेमके किती जण क्लिनिकल विभागात कार्यरत असून प्रत्यक्ष रुग्णसेवा देत आहेत, याबाबत स्पष्टता नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आयुर्विद्यान संस्थेच्या मानकांनुसार काय असायला हवे?
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) व वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या मानकांनुसार, कोणतेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे केवळ अध्यापन संस्था नसून “Teaching Hospital” म्हणून कार्यरत असणे आवश्यक असते. त्यानुसार खालील सेवा प्रत्यक्ष उपलब्ध असणे अपेक्षित मानले जाते:

क्लिनिकल तज्ञांची नियमित उपलब्धता :
मेडिसिन, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग, मानसोपचार, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी अशा सर्व प्रमुख विभागात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व निवासी डॉक्टरांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते.
अध्यापनासोबत उपचार सेवा :
वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचे कार्य केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसते. बाह्यरुग्ण विभाग (OPD), आंतररुग्ण विभाग (IPD), शस्त्रक्रिया, आपत्कालीन सेवा, राऊंड्स आणि रेफरल व्यवस्थापनात त्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो.
बहुविशेषज्ञ उपचार प्रणाली :
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रेफर होणाऱ्या रुग्णांसाठी बहुविशेषज्ञ (Multi-disciplinary) उपचार पद्धती, संयुक्त वैद्यकीय सल्लामसलत आणि क्लिष्ट प्रकरणांवर वरिष्ठ तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध असणे आवश्यक आहे
२४x७ आपत्कालीन आणि सुपर-स्पेशालिटी दृष्टिकोन :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्हा रुग्णालयाच्या पुढील स्तरावरील उपचार केंद्र मानले जाते. त्यामुळे आपत्कालीन शस्त्रक्रिया, अतिदक्षता सेवा, भूलसेवा, रक्तपेढी, नवजात अतिदक्षता आणि ट्रॉमा व्यवस्थापन सक्षम असणे अपेक्षित असते.

प्रत्यक्षात चित्र वेगळे?
परभणीत मात्र उपलब्ध माहिती आणि स्थानिक स्तरावरील अनुभवातून उपचार व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी अजूनही जिल्हा शासकीय रुग्णालयातील विद्यमान डॉक्टरांवरच असल्याचे दिसून येते. जिल्हाभरातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रेफर होणारे रुग्ण, वाढती बाह्यरुग्ण संख्या आणि मर्यादित उपलब्ध मनुष्यबळ यामुळे डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत डॉ. रवींद्रनाथ चव्हाण यांनी कार्यकाळात रुग्णालयाला भेट दिली नसल्याचे आरोप समोर येत असून, यामुळे प्रशासन, वैद्यकीय कर्मचारी आणि सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व नाराजी व्यक्त केली जात आहे.
दोन विभागांचा समन्वय अभाव रुग्णांसाठी घातक?
परभणीतील ही व्यवस्था सध्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संक्रमण अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत दोन विभागांतील प्रशासनिक समन्वयाचा अभाव हा केवळ कार्यालयीन मुद्दा न राहता थेट रुग्णसेवेवर परिणाम करणारा विषय ठरत आहे.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतून जिल्हा रुग्णालयात रेफर होणाऱ्या गंभीर रुग्णांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाने उच्चस्तरीय उपचारांचे केंद्र बनणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात उपचार सेवा पूर्ववत जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांवरच अवलंबून असल्यास “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय” या संकल्पनेच्या उद्देशालाच धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
उत्तरदायित्वाचा प्रश्न अनुत्तरित
महाविद्यालयात मंजूर पदे, उपलब्ध प्राध्यापक, दिले जाणारे भत्ते आणि प्रत्यक्ष उपचार सेवा यांचा संबंध सार्वजनिकरीत्या स्पष्ट करणे ही प्रशासनाची जबाबदारी ठरते. विशेषतः:
क्लिनिकल विभागातील किती तज्ञ प्रत्यक्ष सेवा देतात?
OPD/IPD मध्ये त्यांची उपस्थिती किती आहे?
संयुक्त राऊंड्स, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवेत सहभाग किती?
रुग्णालयातील कामाचा भार कमी करण्यासाठी कोणती कार्ययोजना आहे?
या प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्ट आहेत.
रुग्णांच्या हितासाठी तातडीच्या उपाययोजना आवश्यक
परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आता संक्रमण अवस्थेच्या कारणांपलीकडे जाऊन स्वतःची स्वतंत्र वैद्यकीय सेवा ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. क्लिनिकल तज्ञांची प्रत्यक्ष नियुक्ती, नियमित उपस्थिती, पारदर्शक सेवा माहिती, विभागनिहाय उपचार क्षमता आणि वरिष्ठ स्तरावरील देखरेख याशिवाय परिस्थितीत सुधारणा होणे कठीण दिसते.




































