
नांदेड :डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गतवर्षी 30 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत 24 तासाचा कालावधीत 24 मृत्यू झाले होते.या रुग्णालयात दररोज होणाऱ्या सरासरी मृत्यूचे हे प्रमाण दुप्पट होते.
जन आरोग्य अभियान महाराष्ट्र टीमच्या वतीने या घटनेच्या नंतर 06 व 07 ऑक्टोबर 2023 या दोन दिवसात डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन घटनेचे तथ्य शोध घेतला आणि अहवाल प्रकाशित केला.
काय होते या अहवालात ठळक मुद्दे
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी),नांदेड ची स्थापना 1988 मध्ये झाली. घटनेच्या वेळी या वैद्यकीय महाविद्यालयात पदवीपूर्व वैद्यकीय (एमबीबीएस) जागा 150 तर पदव्युत्तर (पीजी) जागा 83 असल्याचे समोर आले.वैद्यकीय महाविद्यालयात एनएमसीच्या ( नॅशनल मेडिकल कौन्सिल) नियमांनुसार एक मोठे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहे.या रूग्णालयाची सध्याची अधिकृत खाटांची क्षमता ( बेड कप्यासीटी) ५०८ आहे, पण कार्यरत खाटांची संख्या १०८० आहे, तर अनेकदा प्रत्यक्ष प्रवेश ( अडमिशन्स) यापेक्षा जास्त असल्याचे नोंदवले गेले आहे.
30 सप्टेंबर मध्यरात्री ते 1 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्री पर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीत,नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ( GMC रुग्णालयात) 24 मृत्यू झाले.या रुग्णालयात दररोज होणाऱ्या सरासरी मृत्यूंच्या हे प्रमाण दुप्पट होते.दररोजचे प्रमाण 9-12 मृत्यू .या 24 मृत्यूंपैकी 11 नवजात शिशूंचे (1-4 दिवसांचे बाळ), श्वसन त्रास,अपुरे दिवस भरलेले ( नऊ महिन्यापेक्षा कमी दिवस भरलेले) बर्थ एस्फिक्सिया,सेप्टिसीमिया,मेकोनियम एस्पिरेशनचे निदान झालेले होते.नऊ मृत्यू 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तींचे होते,यांच्या मृत्यूची विविध कारणे होती.

त्या दिवशी झालेल्या 24 मृत्यू पैकी 17 मृत्यू अशा रुग्णांचे होते ज्यांना इतर रुग्णालयातून रेफर करण्यात आले होते.
प्रसारमाध्यमांमध्ये ही परिस्थिती मोठ्या प्रमाणावर नोंदवली गेली आणि संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे कारण बनली.जन आरोग्य अभियानाच्या वतीने चार सदस्यीय तथ्य शोध समिती स्थापन करून 6 व 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान नांदेडला भेट दिली. टीमला मिळालेल्या माहितीची ही पार्श्वभूमी होती,ज्याचा संक्षिप्त अहवाल निष्कर्षासह प्रकाशित केला गेला.
माहिती मिळवण्यासाठी टीमने भेटी दिलेली ठिकाणे आणि व्यक्ती
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), नांदेड येथे तथ्य शोध समितीने रुग्णाचे नातेवाईक, परिचारिका युनियनचे प्रतिनिधी,कर्मचारी परिचारिका, निवासी डॉक्टर,वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक आणि डीन यांची भेट घेतली.
जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल),नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन),अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रशासकिय जबाबदारी असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात आली.
महिला रुग्णालय,नांदेड समितीने अधीक्षक,वरिष्ठ सल्लागार,तज्ञ डॉक्टर,निवासी डॉक्टर आणि परिचारिका यांची भेट घेतली.
सीएचसी,नांदेड वाघाळा महानगरपालिका येथे अधीक्षक,तज्ञ डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि परिचारिका यांच्याशी चर्चा केली.
या सार्वजनिक आरोग्य सुविधांना भेट देण्याबरोबरच,नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या काही खासगी वैद्यकीय सेवा देणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक,सिनिअर प्रायव्हेट डॉक्टर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यां कडूनही प्रतिक्रिया व अभिप्राय घेण्यात आला.भेटी दरम्यान समिती सोबत संपर्क आलेल्या सर्व घटकांकडून एकंदरीत चांगला प्रतिसाद मिळाला आणि जिथे जिथे भेट दिली तिथे सामान्यत: मूलभूत माहिती दिली गेली.
तथ्य शोध समितीचे प्रमुख निष्कर्ष
समितीकडे उपलब्ध असलेल्या वेळेत,विविध व्यक्तीं आणि सुविधा यांना दिलेल्या भेटीद्वारे महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या विविध स्तरांबाबत काही मुख्य निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले ते पुढील प्रमाणे :
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) टीमने प्रामुख्याने वाढलेल्या नवजात शिशु मृत्यू संख्येचा संदर्भ लक्षात घेऊन नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU),बालरोग अतिदक्षता विभाग (PICU) आणि स्त्रीरोग,प्रसूती वॉर्डांना भेटी दिल्या.
