
परभणी: शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांना बसला आहे. परळी रेल्वे गेट परिसरातील साखला प्लॉट, लोहगाव रोड येथे आज ४ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका भरधाव आयशर ट्रकने उभ्या वाहनांना भीषण धडक दिली. या भीषण अपघातात किमान ५ ते ६ लोक गंभीर जखमी झाले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास परळी रेल्वे गेट बंद होते. त्यामुळे लोहगाव रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव आयशर ट्रकने नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.
अपघातातील नुकसान:
वाहने: एक होंडा दुचाकी, एक स्कुटी आणि प्रवासी वाहतूक करणारा ॲपे ऑटो पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आहे.
विक्रेते: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भाजी विक्रेत्यांच्या गाड्यांनाही या ट्रकने चिरडले.
जखमी: या भीषण धडकेत ५ ते ६ नागरिक जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशासकीय यंत्रणा ढिम्म; नागरिकांचा संताप
हा भाग कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. याठिकाणी अपघात झाल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक नागरिकांच्या मते, प्रभाग क्रमांक १६ आणि लोहगाव रोड परिसरात रस्ते सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे.
“आम्ही वारंवार रस्ते सुरक्षा आणि पदपथ सर्वेक्षणाबाबत महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे दाद मागितली, पण प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले. सहा महिन्यांपूर्वीच येथे एका पिकअपच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता, तरीही यंत्रणांना जाग आली नाही,” असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.




































