
बायोमेट्रिक अन् फेस रेकग्निशन हजेरी असूनही डॉक्टरांच्या प्रत्यक्ष सेवांवर प्रश्नचिन्ह; शासकीय रुग्णालयात एआय देखरेखीची गरज
परभणी : कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या नियंत्रणासाठी सुरू करण्यात आलेला राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ (MAHA-PULSE AI) प्रकल्प परभणी जिल्ह्यातही तातडीने कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची प्रत्यक्ष उपस्थिती, कार्यवेळेतील रुग्णसेवा आणि प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी हे तंत्रज्ञान प्रभावी ठरू शकते.
एआय तंत्रज्ञान कसे काम करणार?
रुग्णालयांमधील विद्यमान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णांची गर्दी, प्रतीक्षा वेळ, रांगांचे व्यवस्थापन, स्वच्छता आणि आपत्कालीन घटनांचे विश्लेषण करेल. ही माहिती जिल्हास्तरीय कमांड सेंटरला उपलब्ध होऊन संबंधित वरिष्ठांना तातडीने सूचना देता येतील. त्यामुळे केवळ हजेरी नोंदविण्याऐवजी प्रत्यक्ष सेवा उपलब्धतेवर देखरेख शक्य होईल.
हजेरी तंत्रज्ञान असूनही प्रत्यक्ष सेवा कुठे?
परभणीतील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बायोमेट्रिक हजेरी आणि त्यानंतर फेसबेस्ड उपस्थिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या यंत्रणा असूनही काही डॉक्टरांकडून निर्धारित कार्यवेळेत प्रत्यक्ष रुग्णसेवा न देता वेतन घेतले जात असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. वरिष्ठ पातळीवरील संभाव्य संगनमत आणि नियंत्रण यंत्रणेतील त्रुटींमुळे अशा प्रकारांना अभय मिळत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. त्यामुळे केवळ डिजिटल हजेरी नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णसेवेचे स्वतंत्र तंत्रज्ञानाधारित परीक्षण आवश्यक आहे.































