परभणीत वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र; सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करण्यासाठी पत्रकारांचा आक्रमक पवित्रा

परभणी (प्रतिनिधी) शहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था आणि वारंवार होणारे जीवघेणे अपघात या पार्श्वभूमीवर आज शहरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांच्या अपघाती मृत्यूच्या तपासात गती आणून दोषींवर ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करावा आणि शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी, या प्रमुख मागण्यांसाठी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
प्रशासकीय यंत्रणेला साकडे
सोमवारी (११ मे) प्राचार्य सुरेश नाईकवाडे, विशाल माने, कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आणि महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची भेट घेतली. मागील अनेक महिन्यांपासून शहरातील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, यामुळे सामान्य नागरिकांचे बळी जात असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
सिग्नल यंत्रणा: शहरातील सर्व प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा युद्धपातळीवर दुरुस्त करून सुरू करावी.
गतिरोधकांची उभारणी: वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालय, तलाठी कार्यालय, कृषी विद्यापीठ गेट, खानापूर फाटा आणि कारेगाव फाटा यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी तातडीने शास्त्रोक्त गतिरोधक बसवावेत.
अतिक्रमण निर्मूलन: रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग, रस्ते व्यापणारे वाहन दुरुस्तीचे गॅरेज आणि भाजी-फळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करून रस्ते मोकळे करावेत.
सीसीटीव्ही आणि सुरक्षा: शहरातील प्रमुख मार्गांवर बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, जेणेकरून गुन्हेगारांवर वचक बसेल.
खाजगी ट्रॅव्हल्सवर बंदी: तलाठी कार्यालय परिसरातील रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना शहराबाहेर किंवा ठराविक ठिकाणी जागा देऊन तेथील गर्दी कमी करावी.
विजयकुमार मुंदडा अपघात: ‘हिट अँड रन’ कलमाची मागणी
५ मे रोजी वसमत रोडवरील गोल्डन बेकरी परिसरात एका भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, परंतु तपासाच्या संथ गतीबद्दल पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण स्पष्टपणे भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(२) अंतर्गत येत असल्याने, आरोपीवर ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




































