Home आरोग्य जन आरोग्य अभियानच्या पाठपुराव्यानंतर परभणी जिल्हा रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया गृह अखेर सुरू

    जन आरोग्य अभियानच्या पाठपुराव्यानंतर परभणी जिल्हा रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया गृह अखेर सुरू

    कोट्यवधींचा खर्च, तीन-चार वर्षांची गुप्तता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी कायम

    परभणी : ( १५ मे ) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, परभणी हे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. याच कालावधीत परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र नेत्रचिकित्सा शस्त्रक्रिया गृह (Ophthalmology OT) उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली .मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून या स्वतंत्र नेत्र शस्त्रक्रिया गृहाच्या बांधकाम आणि कार्यान्वयन प्रक्रियेबाबत संपूर्ण गुप्तता पाळण्यात आल्याचा गंभीर आरोप जन आरोग्य अभियान महाराष्ट्र, परभणी समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

    विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात शासन निधी अर्थात जनतेचा पैसा खर्च करून उभारण्यात आलेल्या या नेत्र शस्त्रक्रिया गृहात एकही शस्त्रक्रिया करण्यात आली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या खर्चानंतरही नियोजनशून्य पद्धतीने हे शस्त्रक्रिया गृह उभारण्यात आले का? यास प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता कशा पद्धतीने देण्यात आल्या? याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

    जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रच्या परभणी समितीने मागील दीड महिन्यापासून सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला गेला. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे एकमेकांकडे जबाबदारी ढकलत माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप संघटनेने केला होता. या संदर्भात जन आंदोलन करूनही रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आली नसल्याचे अभियानाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

    या संपूर्ण नेत्र शस्त्रक्रिया गृह उभारणी प्रक्रियेत केवळ नियोजनाचा अभाव नसून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जन आरोग्य अभियानाने केला आहे. शासनाने मंजूर केलेला निधी, संसाधने आणि उपकरण खरेदी प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत स्वतंत्र चौकशी समिती गठित करून तत्काळ सखोल चौकशी करावी तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

    या मागण्यांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री तथा आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, संचालक आरोग्य सेवा, जिल्हाधिकारी परभणी, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना सविस्तर निवेदन देण्यात आले होते. तसेच यावर तत्काळ कार्यवाही न झाल्यास 20 मे रोजी उपसंचालक आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर जन आरोग्य अभियानच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता.

    दरम्यान, या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित नेत्र शस्त्रक्रिया गृह सुरू करण्यात आल्याची माहिती दिली असून त्यासंदर्भातील छायाचित्रेही सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यामुळे जन आरोग्य अभियान महाराष्ट्र, परभणी समितीच्या आंदोलनाला आणि सातत्यपूर्ण संघर्षाला हे एक प्रकारचे यश मानले जात आहे.

    जन आरोग्य अभियानच्या वतीने सातत्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संघर्ष केला जात असल्याचे अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, संबंधित नेत्र शस्त्रक्रिया गृह उभारण्यासाठी निवडण्यात आलेल्या जागेचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असल्याचे अभियानाने स्पष्ट केले आहे.

    यासोबतच नेत्र शस्त्रक्रिया गृहासाठी मंजूर करण्यात आलेला निधी, संबंधित योजना, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, बांधकाम प्रक्रिया, उपकरण खरेदी आणि प्रत्यक्ष कार्यान्वयन याबाबतची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी ठाम मागणी जन आरोग्य अभियान महाराष्ट्र, परभणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

    श्रमिक विश्व

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here